कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या मंजूर असलेल्या स्टाफ पॅटर्न मधील रिक्त पदे भरण्याबाबत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरसेवक व माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत लक्ष वेधले.नगरपंचायतचे काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र, या जागी नवीन कर्मचारी देण्यात आले नसल्याने कणकवली शहरातील जनतेची प्रशासकीय कामे होण्यास विलंब होत आहे. गतिमान प्रशासन कणकवलीकरांना मिळावे व त्यातून जनतेची कामे जलद गतीने मार्गी लागावी यासाठी नगरपंचायतीचा मंजूर स्टाफ पॅटर्न मधील रिक्त पदे भरण्याची गरज आहे. याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी अशी मागणी नगराध्यक्ष नलावडे व उपनगराध्यक्ष हर्णे यांनी केली.तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. मात्र नगरपंचायतीच्या सभा ऑफलाइन घेण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त नाहीत. यामुळे अनेकदा नेटवर्कच्या समस्येमुळे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी नगरसेवकांना योग्य संधी मिळत नाही. पर्यायाने जनतेची कामेही रखडण्याची व विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपंचायतच्या सभेत प्रभागातील समस्या मांडण्यासाठी नगरसेवकांना संधी मिळते.शहरांच्या विकासासाठी नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील प्रश्न या सर्वसाधारण सभेत मांडता येतात. मात्र सर्वसाधारण सभा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने घेण्यास मान्यता नसल्याने याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून तसे आदेश संबंधित प्रशासनाला देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर कणकवली मुख्याधिकारी पद गेले काही महिने रिक्त असून प्रभारी मुख्याधिकारी यांच्याकडे कार्यभार देण्यात आलेला आहे.
हे मुख्याधिकारी पूर्णवेळ शहरासाठी देऊ शकत नसल्यामुळे शहरातील जनतेची अनेक कामे रखडत आहेत. प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक किशोर राणे आदी उपस्थित होते.