बांदा/सिंधुदुर्ग : गोव्यात कामासाठी जाणार्या मुलांना आता कॉरंटाईनची गरज नाही. महाराष्ट्रातील लोकांसाठी वेगळी प्रक्रिया लागू करण्याचा प्रस्ताव गोवा सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.
तपासणी नाक्यावर एका दिवसात स्वॅबची तपासणी करून तात्काळ अहवाल दिला जाईल, असे आश्वासन गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आज येथे आयोजित बैठकित दिले. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेल्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून गोव्यात कामासाठी जाणार्या मुलांचा मार्ग मोकळा झाला आहे.
लॉकडाऊनमुळे गोव्यात जाणाऱ्या युवक-युवती सिंधुदुर्गमध्येच अडकून पडले आहेत. त्यामुळे अनेकांच्या रोेजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला असून काहींना तर कामालाही सध्या बोलावले जात नाही. त्यामुळे या प्रश्नात स्वत: दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष घातले आणि त्यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क केला.
मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रश्नात गंभीरपणे लक्ष घातले जाईल तसेच गोव्यात नोकरीसाठी येणाऱ्या युवक युवतींची नोंदणी करा व ती गोव्याला पाठवा, असे आवाहन केले होते.