सावंतवाडी :
महाविकास आघाडीला धक्का देत शिंदे गटात दाखल झालेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानावर आता शिंदे गटातील नेत्यांचा समावेश असलेला फलक लावण्यात आला आहे. त्याठिकाणी संपर्क कार्यालय असा उल्लेख करण्यात आला असून बाजूला दोन भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.तब्बल अडीच महिन्यानंतर हा फलक बदलण्यात आला आहे.
गेले अनेक दिवस केसरकर यांनी आपल्या कार्यालयावर असलेला बॅनर बदलला नसल्याने राजकीय पदाधिकार्यांसह नागरीकांत चर्चा होती. मात्र अखेर हा बॅनर बदलल्याने सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.मंत्री केसरकर यांनीच हा बदलण्याची सुचना केली होती त्यानंतर हा फलक बदलण्यात आला आहे.हा बदल शुक्रवारी करण्यात आला आहे.असे सांगण्यात येते.
शिवसेनेचे आमदार असलेले दिपक केसरकर हे अचानक शिंदे गटात गेले आणि नव्या शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामिल झाले. त्या ठिकाणी त्यांना शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सुध्दा मिळाली. दरम्यान केसरकर मंत्री झाले असले तरी त्यांनी आपल्या कार्यालयावर असलेला फलक बदलला नव्हता. त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पडते यांची छबी असलेला बॅनर कायम ठेवला होता.
त्यामुळे हा बॅनर चर्चेचा विषय बनला होता. अनेक राजकीय विरोधकांनी बॅनरचे फोटो काढुन सोशल मिडीयावर जोरदार चर्चा केली होती. दरम्यान दोन दिवसापुर्वी केसरकर यांच्या कार्यालयावर आता शिंदे गटातील नेत्याचा समावेश असलेला बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय, असा उल्लेख करण्यात आला आहे. तर बाजूला दोन भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.