ओरोस : अखेर १५ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य द्वार तोडण्यात आले. हा दरवाजा खुला करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने हा दरवाजा खुला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र लाकडी रिपांनी बंद करण्यात आलेला दरवाजा उघडत नसल्याने हा दरवाजा पूर्णतः तोडून खुला करण्यात आला आहे. त्यामुळे १५ दिवसांनंतर या कार्यालयाचा कारभार मुख्य द्वाराने सुरू झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाची प्रशासकीय इमारत अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्यात येणारे सर्व मार्ग ४ जून रोजी बंद करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने इमारतीचे अनेक दरवाजे बंद केल्याने या इमारतीमधील विविध कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांची गैरसोय होत होती.
ज्या ठिकाणी अपंग व्यक्तींसाठी रेलिंग आहेत, त्या ठिकाणचे दरवाजे बंद असल्याने त्यांना पायऱ्या आणि जिना चढण्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे शासकीय कामासाठी येथे येणाऱ्या वयोवृद्ध आणि अपंगांची होणारी ससेहोलपट कधी थांबणार, असा प्रश्न या वयोवृद्ध नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.
अखेर शुक्रवारी १५ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य दरवाजा खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा दरवाजा शुक्रवारी खुला केला. मात्र हा दरवाजा बंद करण्यासाठी लाकडी रिपा व फळ्या वापरण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा दरवाजा खुला होत नव्हता. अखेर हा दरवाजा पूर्णतः तोडून टाकत मार्ग खुला केला आहे.कार्यालये बंद पण दरवाजा राहणार खुलाजिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य दरवाजा १५ दिवसांच्या कालावधीनंतर खुला झाला आहे. ही समाधानाची बाब असली तरी हा दरवाजा खुला करण्यासाठी पूर्णतः दरवाजा तोडून काढण्यात आला आहे. त्यामुळे हा दरवाजा कार्यालये बंद झाल्यानंतर बंद करता येणार नाही. तो खुलाच राहणार आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये असणाऱ्या कार्यालयातील साहित्य यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.