सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुसलेला मान्सून अखेर आजपासून (गुरूवार ) पुन्हा सक्रिय झाला असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. मात्र त्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. पहिल्या पावसात भात पेरणी केल्यानंतर शेतकऱ्याला भात लावणीसाठी मोठ्या पावसाची गरज असते. पावसाने दडी मारल्याने भात लावणीची कामे खोळंबली होती. आता संतदार पाऊस कोसळू लागल्याने भात लावणीच्या कामांनाही वेग येणार आहे. जून महिन्याचा दुसरा आठवडा संपून गेला तरी पाऊस पडत नसल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवत होता. आता आज, गुरुवारी सकाळपासून संततदार पावसाने सुरुवात केल्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत.जून महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो गतवर्षी मात्र तो पडला नव्हता. त्यामुळे जिल्ह्याची सरासरी सुद्धा भरली नव्हती. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त असल्याचा अंदाज हवामान खात्याने अगोदरच वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान होते.महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून सक्रिय झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र तो हवा तसा पडला नसल्यामुळे चिंता पसरली होती. परंतु आता जूनच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस आपली राहिलेली सरासरी भरून काढेल असा अंदाज वर्तवण्यास काही हरकत नाही.आज, सकाळपासूनच मेघगर्जनेसह दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे आता आगामी दोन दिवस संततदार पाऊस कोसळेल असे वातावरण आहे. नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर पर्यटनात्मकदृष्ट्या सिंधुदुर्ग मधील सर्व धबधबे दोन दिवस पाऊस पडल्यास तुडुंब भरून वाहणार आहेत.
अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय, शेतकरी सुखावला
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 20, 2024 4:34 PM