कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नरडवे रोड येथे असलेल्या साबिया गॅरेजला भीषण आग लागली. या आगीची झळ गॅरेजच्या बाजुला असलेल्या 'हॉटेल सदगुरु' लाही बसली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी एका रांगेत सुमारे २० ते २५ स्टॉल असून आग वेळीच आटोक्यात आणल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना काल, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आग लागल्याची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कणकवली नगरपंचायतीच्या अग्नीशामक बंबाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग वेळीच आटोक्यात आली. साबिया ऑटो गॅरेज मागील बाजूस अज्ञाताने थंडी पासून बचावासाठी कोणी शेकोटी पेटवली असावी. त्याचीच झळ लागून गॅरेजला आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत होता. या आगीत ऑईल व इतर सामानासह स्क्रॅप मधील गाड्या जळून खाक झाल्या. त्यानंतर लगतच असलेल्या 'हॉटेल सदगुरू’ला देखील या आगीची झळ बसली. मात्र, वेळीच उपस्थित नागरिकांनी त्यातील सामान बाहेर काढले. यावेळी सुशिल तांबे, वैभव आरोलकर, फर्नांडीस, ओमकार वाळवे, नगरपंचायत कर्मचारी जाधव, मोर्ये, गणेश लाड आदी उपस्थित नागरिकांनी मदत कार्य केले. तर पोलीस नाईक पी.एस. पार्सेकर, मकरंद माने, होमगार्ड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत विविध प्रकारचे साहित्य मिळून एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे गॅरेज मालक अल्तमस शेख व शारूख शेख (बोर्डवे) यांनी सांगितले.
कणकवलीत गॅरेजला आग; लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 4:56 PM