कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट-भालेकरवाडी येथील प्रमिला अशोक भालेकर यांच्या घराला शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून घर बेचिराख झाले. यात घरासहीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने व घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे भालेकर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रमिला भालेकर या घरात मोबाईलला रेंज नसल्याने शुक्रवारी रात्री घराबाहेर पडल्या. अंगणापुढे जाऊन त्या आपल्या मुलीला फोन करीत होत्या. त्याचवेळी अवघ्या पाच मिनिटांतच घरातून आगीचा लोळ येऊ लागल्याचे त्यांना दिसले. याचवेळी बाजूच्या अजय भालेकर यांच्या पत्नीने हे दृश्य पाहताच कुटुंबीयांना तसेच वाडीतील ग्रामस्थांना आग लागल्याचे सांगितले.ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत घराचे जंगली वासे, कौले, पत्रे, लाकडी दरवाजे, इलेक्ट्रीक वायर, बोर्ड यासह तांदुळ, धनधान्य, किमती वस्तू, शेगड्या, गॅस सिलिंडर, भांडी आदी वस्तू आगीत भस्मसात झाल्या आहेत.
प्रमिला भालेकर यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून या दुर्घटनेने त्यांना धक्काच बसला. या घटनेची माहिती समजताच पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, सरपंच संतोष आग्रे, बबन हळदिवे, ग्रामसेवक चौकेकर, तलाठी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात २ लाख ९४ हजार ७०० रुपयांची हानी झाली असल्याचे म्हटले असले तरी हे नुकसान सुमारे ५ लाखांपर्यंत आहे. भालेकरवाडीतील ग्रामस्थांनी सुमारे पाऊणतास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. शनिवारी सकाळी तहसीलदार आर. जे. पवार व पोलिसांनी घटनेची पाहणी केली.