मालवण (सिंधुदुर्ग): मालवण शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड मार्गावर असलेल्या दुकानांपैकी दोन दुकानांना शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. मॉर्निग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना ही आग दिसताच त्यांनी इतरांना कळवले. नागरिक, अग्निशमन बंम्ब घटनास्थळी पोहचले मात्र भडकलेल्या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली.
विलास परुळेकर यांचे शिलाई मशीन दुरुस्ती व विक्रीचे एक दुकान यातील नव्या व जुन्या अश्या एकूण १२ ते १५ मशीन तसेच फर्निचर व संपूर्ण दुकान जळाले. तर बाजूला असलेले मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलर व शिवणक्लास हेही दुकान जळाले. यातील मशीन साहित्य व ग्राहकांचे कपडे हे जळून खाक झाले. काही ग्राहकांचे लग्नाचे कपडेही दुकानात होते. त्याचेही नुकसान झाले.
दुकान मालक, स्थानिक नागरिक तसेच महेश सारंग, राजू बिडये यासह अन्य नागरिक नगरपालिका अग्निशमन यांनी आग विझवली. मात्र दोन्ही दुकानांचे नुकसान झाले. नायब तहसीलदार गंगाराम कोकरे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुढील प्रक्रिया महसूल प्रशासनाच्या माध्यमातून करण्याची कार्यवाही सुरू होती.