सिंधुदुर्ग : जिल्हा रुग्णालय परिसरातील वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकारी वर्गासाठीच्या इमारत वसाहतीला गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. सुदैवाने या इमारतीमध्ये कोणीही राहत नसल्याने मनुष्यहानी टळली. मात्र, आतील सामानाचे व इमारतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी ७ वाजता कुडाळ एमआयडीसीच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यास कर्मचाऱ्यांना यश आले.जिल्हा रुग्णालय परिसरात मोठमोठे आगीचे लोळ उठत असल्याचे पाहून सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णांचे नातेवाईक व परिसरातील लोकांनी गर्दी केली. काहींनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ती भडकत होती.
त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. इमारतीत कोणी राहत नसल्याने सुदैवाने जीवितहानी टाळली. आत मध्ये बेड, सोफा व इतर साहित्य असल्याने आगीने भडका घेतला.दरम्यान, या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, जिल्हा रुग्णालय परिसराच्या बाहेर जंगलमय भागात आग लागली होती. त्याची ठिणगी तेथून जवळ असलेल्या इमारतीत पडली.
ही इमारत खूप जुनी असून तिचे निर्लेखन झालेले आहे. परंतु आतील साहित्यामुळे या आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची गंभीरता ओळखून अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविले.जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जात पडताळणी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, रेडिओ सेंटर, बँका, आयटीआय महाविद्यालय यासारखी महत्त्वाची कार्यालये आहेत. तसेच अधिकाऱ्यांचे बंगले, वसाहती आहेत.या ठिकाणी दररोज हजारो माणसे कामानिमित्त येत असतात. येथील आजूबाजूचा परिसर हा जंगलमय आहे. दरवर्षी या परिसरात वनवा पेटतो. मात्र, या ठिकाणी एकही अग्निशमन वाहन नाही. प्रत्येक वेळी इतर अग्निशमन दलावर अवलंबून रहावे लागते. या ठिकाणी एवढी महत्त्वाची कार्यालये असतान देखील लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसून येत नाही हे दुर्दैव आहे.