दोडामार्ग : आडाळी येथील काजू बागायतीला रविवारी सायंकाळी आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. ऐन हंगामात काजू बागेला लागलेल्या आगीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.आडाळी येथील जयराम दत्ताराम गावकर व पराग महादेव गावकर या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने काजू बागायती फुलविली आहे. दरवर्षी या काजू बागायतीतून त्यांना लाखो रूपयांचे उत्पन्न मिळते. यावर्षीच्या हंगामात चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, रविवारी सायंकाळी काजू कलम बागेला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे आशेची निराशा झाली.
सायंकाळी उशिरा आग लागली आणि काही वेळातच परिसरात पसरत गेली. आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळेपर्यंत शंभरहून अधिक काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात आली. या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.नुकसानीच्या निकषात बदल करा!दोडामार्ग तालुक्यात दरवर्षी वणवे लागून काजू कलमे जळून खाक होण्याच्या दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडतात. मात्र त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. नुकसान भरपाई देताना शासकीय निषक आडवे येतात. त्यामुळे या निकषात बदल करण्याची मागणी शेतकरी व काजू बागायतदारांतून होत आहे.