कणकवली : शिवडाव ओटोसवाडी येथील १५ ते २० एकर परिसरातील काजू, आंबा, माड बागायती असलेल्या ठिकाणी दुपारी अचानक आग लागली. या भीषण आगीत त्या परिसरातील ८ ते १० शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणत असताना दोन सावंत कुटुंबीयांची आग लावल्याच्या संशयावरून शाब्दीक बाचाबाची होऊन मारहाणीचा प्रकार घडला. त्यात दत्तराज लक्ष्मण सावंत हे जखमी झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली तालुक्यातील शिवडाव-ओटोसवाडी पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात माळरानावर शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात गोरे यांचे घर वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. तर कित्येक एकरातील काजू, आंबा कलमे जळाली. ही आग विझवताना तेथील दोन सावंत कुटुंबात भांडण जुंपले. त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.
यात एका कुटुंबातील चार सदस्यांनी आपणास दांड्यानी मारहाण केल्याची तक्रार दत्तराज सावंत (४६) यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. तर दत्तराज सावंत व इतरांनी आपल्या कुटुंबियास मारहाण केल्याची तक्रार मनीषा सावंत यांनी केली असून दोन्ही कुटुंबिय कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.लाखो रुपयांचे नुकसानदरम्यान, शिवडावच्या माळरानावरील आगीत उपेंद्र नाडकर्णी, रवी सावंत, दीपक सावंत, आत्माराम सावंत, प्रभाकर सावंत आदींच्या आंबा, काजू कलमांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.