सावंतवाडी : माजगाव-खालचीआळी येथील राजेश ज्ञानेश्वर धुरी यांच्या दुकानाला सोमवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटने आग लागून सर्व साहित्य जळून भस्मसात झाले. यामुळे धुरी यांचे सुमारे ५३ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. ज्ञानेश्वर धुरी यांचे माजगाव-खालचीआळी येथे श्री देवी सातेरी जनरल स्टोअर्स आहे. दुकानाशेजारीच ते राहतात. सोमवारी मध्यरात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने काही वेळातच आग पसरून भडका उडाला. दुकानातील शीतपेयाच्या बाटल्यांचा स्फोट होऊ लागल्याने धुरी जागे झाले आणि दुकानाकडे धाव घेतली; परंतु तोपर्यंत संपूर्ण दुकानाने पेट घेतला होता. धुरी यांनी तत्काळ सावंतवाडी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला कळविले. मात्र, आगीचा भडका मोठा असल्याने आग आटोक्यात आणेपर्यंत आतील सर्व सामान जळून खाक झाले. आगीत दुकानातील सव्वा लाख रुपये किमतीचे तीन फ्रीज, ५० हजार रुपयांचा इन्व्हर्टर, ४० हजार रुपयांचे दोन इलेक्ट्रिक काटे, तसेच तेल, कडधान्य, १४ लाख रुपये ५० हजार रुपयाचे बेकरी साहित्य, ५५ हजार रुपयांची स्टेशनरी, ४५ हजार रुपये किमतीच्या शीतपेयाच्या बाटल्या, फर्निचर साहित्य ६ लाख रूपये यासह २० लाख रुपयांचे इमारतीचे नुकसान आणि इतर किरकोळ साहित्य ९ लाख मिळून सुमारे ५३ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. माजगाव तलाठी डी. डी. डौरे व सावंतवाडी पोलिसांनी पंचनामा केला. (वार्ताहर)
माजगाव येथे आगीत दुकान भस्मसात
By admin | Published: April 15, 2015 12:54 AM