आचरा : आचरा बाजारपेठेतील अरूण ढेकणे यांच्या लक्ष्मी क्लॉथ स्टोअर्स या कापड दुकानास सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत दुकानाच्या एका भागात ठेवलेले कपडे जळून सुमारे ५ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.आगीची घटना समजताच मदतीला धावून आलेल्या व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने संपूर्ण दुकान आगीपासून वाचले व मोठी दुर्घटना टळली.
आगीचे कारण समजू शकले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत आचरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.आचरा बाजारपेठेतील ढेकणे यांच्या लक्ष्मी क्लॉथ स्टोअर्स या कापड दुकानास आग लागली असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या गांवकर या युवकाच्या लक्षात आल्यावर त्याने तातडीने याबाबत जवळच राहणाऱ्या कोदे, पाटकर यांना माहिती दिली. त्यानंतर मिनल कोदे, बाळू कोले, विजय पाटकर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.या घटनेबाबत व्यापारी संघटनेला माहिती मिळताच संघटनेचे बाबू परूळेकर, निखिल ढेकणे, शैलेश शेट्ये, हेमंत गोवेकर, रुपेश हडकर तसेच मंदार आचरेकर, दाजी आचरेकर, पंकज आचरेकर, गणेश गोवेकर, परूळेकर आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वीज कंपनीचे कर्मचारी पिंट्या साळकर यांना बोलावून वीजपुरवठा खंडित करण्यात आला.मंगळवारी सकाळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढेकणे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तसेच पोलीस तक्रार देण्यास सहकार्य केले. पोलीस कर्मचारी चव्हाण, कैलास ढोले, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.कपड्यांनी पेट घेतल्याने आगीचा भडकाकपड्यांनी पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला होता. पण सर्वांनी प्रसंगावधान दाखवित आग आटोक्यात आणल्याने दुकानाच्या एका भागात ठेवलेले कपडे जळून गेले. यात ब्लँकेट, चटई, लहान मुलांच्या गाद्या, बॅग्स, साड्या यांसह रेडिमेड कपडे जळून सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचे कपडे जळून गेले तर इमारतीचे सुमारे ८० हजारांचे नुकसान झाले आहे.