वैभववाडी : तिरवडे तर्फ खारेपाटण पाटीलवाडी येथील दिलीप पांडुरंग घुगरे यांचे निम्मे घर सोमवारी पहाटेच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शेजाऱ्यांनी धावपळ करून निम्मे घर वाचविले. अचानक लागलेल्या या आगीमुळे घुगरे यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. घुगरे यांची आई प्रभावती या नेहमीप्रमाणे घर बंद करून झोपायला शेजारी पुतण्याकडे गेल्या होत्या. त्यामुळे पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीची सुरुवातीला कोणालाही कल्पना आली नाही. घराचे कौलारू छप्पर जळताना जोरात आवाज येऊ लागल्याने शेजाऱ्यांना जाग आली. तेव्हा घुगरे यांच्या घराचे छप्पर जळताना दृष्टीस पडले. त्यामुळे आरडाओरड करून शेजाऱ्यांना जमवत ग्रामस्थांनी जवळच्या बोअरवेलच्या पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे घुगरे यांचे निम्मे घर बचावले. आगीत घरातील सुमारे सात क्विंटल भात, कपडे, फर्निचर व इतर साहित्य भस्मसात झाले. त्यामुळे दिलीप घुगरे यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज असून, जयसिंग घुगरे, प्रवीण घुगरे, सुनील घुगरे, महेश घुगरे, गणेश घुगरे, संकेत घुगरे, सागर घुगरे, आदी महिला व ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. भुईबावडा महसूल मंडल अधिकारी एस. बी. यादव, पोलीसपाटील प्रल्हाद पावले यांनी जळिताचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)
तिरवडेत पहाटे घराला आग
By admin | Published: January 05, 2016 12:30 AM