वेंगुर्ला : वडखोल-परबवाडी येथील प्रज्ञा पांडुरंग परब यांच्या गवताच्या गंजीला तसेच आंबा व काजू कलमांना आग लागून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण या बागेतून जाणाऱ्या वीज वाहिन्यांच्या घर्षणाने असल्याने वीज वितरण कंपनीकडे या संदर्भात एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार करूनही वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे.वडखोल-परबवाडी येथे रविवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन येथील प्रज्ञा परब यांच्या आंबा व काजू बागेला आग लागली. ही आग पुढे पुढे जात तेथील असणाऱ्या गवताच्या गंजीला लागली. या आगीत सुमारे ६ हजारांपेक्षा अधिक गवताच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. तसेच आंबा व काजू कलमे आगीत होरपळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.ही घटना समजताच येथील प्रज्ञा परब, गोपीचंद परब, मुकुंद परब, राजाराम राणे, भास्कर परब, बाबाजी परब, मंगेश परब, नारायण परब, प्रदीप परब, किरण परब, सुशांत राणे, गौरव राणे, काशी परब, गजानन परब, अर्पिता परब, रविना राणे यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.मात्र, ही आग गवताच्या गंजीला लागल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. दरम्यान, घटनास्थळी वेंगुर्ला नगरपरिषदेचा बंब दाखल झाला. यावेळी बंबावर कार्यरत असलेले सागर चौधरी, लक्ष्मण जाधव, गौरव आरेकर, किरण जाधव, निलेश जाधव, सनातन धमानिया, पंकज पाटणकर यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.वेंगुर्ला कार्यालयाचे अधिकारी चव्हाण यांना माहिती समजताच त्यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला. तत्काळ येथील वीज वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले. यावेळी प्रज्ञा परब यांनी मेहनत घेऊन काढलेली गवताची गंजी पूर्णत: जळून खाक झाल्याने व ऐन आंबा, काजू हंगामात आंबा व काजू कलमे होरपळून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वेंगुर्ल्यात आंबा, काजू कलमांना आग, सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:37 AM
वडखोल-परबवाडी येथील प्रज्ञा पांडुरंग परब यांच्या गवताच्या गंजीला तसेच आंबा व काजू कलमांना आग लागून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण या बागेतून जाणाऱ्या वीज वाहिन्यांच्या घर्षणाने असल्याने वीज वितरण कंपनीकडे या संदर्भात एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार करूनही वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे.
ठळक मुद्दे वेंगुर्ल्यात आंबा, काजू कलमांना आग, सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान विद्युत वाहिन्यांच्या घर्षणाने घडला प्रकार