मडुरा : शेर्ले-कास भागातील वाघबिळकर, टोकळी, कोल्ह्याचा पाचा, कासवाचे कोंड येथील ६० ते ७० एकर माळरानावर भीषण आग लागून सुमारे १० ते १५ लाखांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास शेर्ले-कास येथील काजू आणि आंबा बागायतीला आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आग कोणत्या कारणामुळे लागली हे सायंकाळी उशिरापर्यंत कळू शकले नाही. हनुमान जयंती असल्यामुळे शनिवारी माळरानावर कोणीही फिरकले नाही. आग लागल्याचे उशिराने समजल्याने ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पराकाष्ठा केली. परंतु, आग भीषण असल्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्याशिवाय पर्याय नव्हता. सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथील दोन बंब तातडीने बोलावण्यात आले. परंतु, माळरान मोठे असल्यामुळे अग्निशामक दलाला आग विझविताना तारेवरची कसरत करावी लागली. दयानंद धुरी, बाळा धुरी, विमल धुरी, अजित शेर्लेकर, एकनाथ धुरी, नितीन धुरी, विराज नेवगी, बाळा आमडोसकर, देविदास सातार्डेकर, परेश सातार्डेकर, दीपेश सातार्डेकर, श्रीकांत सातार्डेकर, सूरज सातार्डेकर, तन्मय सातार्डेकर, एकनाथ सातार्डेकर, प्रभाकर कळंगुटकर, प्रसाद कळंगुटकर, दिवाकर कळंगुटकर तसेच शेर्ले-कास गावातील अनेक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर) ग्रामस्थांचे सहकार्य मडुरे मंडळ अधिकारी एस. डी. कांबळे यांनी ६० ते ७० एकरांत आग लागली असून, १० ते १५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले. बांदा पोलीस कान्स्टेबल सुहास राणे घटनास्थळी दाखल होते. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
शेर्ले-कास येथे आगीचे तांडव
By admin | Published: April 05, 2015 12:54 AM