देवगड : देवगड तालुक्यातून कुणकेश्वर वाळकेवाडी येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार अरविंद वाळके यांची हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली आहे. गेली सहा वर्षे देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला पाठविण्याचा मान वाळके यांना मिळत आहे.
यावर्षी पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडला असून यामुळे आंबा बागायतदारही चिंतेत आहेत. यावर्षी कमी प्रमाणात आंबा कलमांना मोहोर आला आहे. यामुळे एकूण उत्पादनात घट होणार आहे. जास्त प्रमाणात पडलेला पाऊस व नोव्हेंबर महिन्यात आलेली वादळे यामुळे हापूस हंगाम लांबणीवर पडून एकूण उत्पादनात घटही होणार आहे.
कुणकेश्वर वाळकेवाडी येथील आंबा बागायतदार अरविंद वाळके यांची पहिली आंबा पेटी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात गतवर्षी गेली होती. मात्र, यावर्षी बदलत्या वातावरणाचा फटका आंबा बागायतदारांनाबसला असून यामुळे वाळके यांचीही यावर्षीची पहिली हापूस आंबा पेटी चक्क दोन महिने उशिरा गेली आहे.सप्टेंबर महिन्यात कलमांना आलेला मोहोर तसेच योग्य पध्दतीने फवारणी यावर्षी वाळके यांनी केली होती. अनेक वादळांना सामोरे जाऊनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सप्टेंबर महिन्यात आलेल्या मोहोरावरती योग्य पध्दतीने कीटकनाशकांची फवारणी करून व मेहनत करून फेब्रुवारी १५ पर्यंत पाच डझनच्या १०० पेट्या वाळके वाशी मार्केटला रवाना करणार आहेत.
मंगळवारी माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी दोन पेट्या वाशी मार्केट येथे आ. के. सेजवल या दलालाच्या नावावर पाठविल्या आहेत. त्यांची विक्री बुधवार २९ जानेवारी रोजी केली जाणार आहे. प्रति डझनाला ३ हजार रुपये भाव मिळेल असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.