सिद्धेश आचरेकर --मालवण -शाळा ही संस्काराची पहिली पायरी असते. शिक्षणाच्या माध्यमातून उद्याची सुशिक्षित पिढी घडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजेच पहिलीपासून शिक्षणाची गोडी लागावी यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्याच्या आदेशाचे पालक तसेच शिक्षकवर्गातून कौतुक होत आहे. गेली चार वर्षे नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम केला जात असल्याने पहिलीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही जी भीती असायला हवी ती दूर होत आहे. आपले शिक्षक आपले स्वागत करत आहेत, हे पाहून विद्यार्थी भारावून गेले होते. उन्हाळी हंगामाची सुट्टी संपल्यानंतर बुधवार १५ जूनपासून पुन्हा प्राथमिक शाळेत मुलांचा किलबिलाट सुरु झाला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळात पहिलीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी काही शाळात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात गावपातळीवरील प्रमुख ग्रामस्थ सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मान्यवर व्यक्तींनी प्राथमिक शिक्षणाचे महत्व विशद करताना सातत्य आणि नाविन्यपूर्ण अभ्यास करून शाळेचे नावलौकिक वाढवा, असे आवाहन केले. ‘प्रवेशोत्सवा’चा कार्यक्रम आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील २०७ शाळात ७९१ विद्यार्थ्यांनी पहिलीत प्रवेश घेतला आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, वसंत महाले, उदय दीक्षित तसेच पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, उपसभापती छोटू ठाकूर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीतील विविध विभागाच्या खातेप्रमुखांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. निरागस चेहऱ्यांना शिकण्याची प्रचंड उमेदशाळा म्हटली ही पोटात गोळा येणे हे शाळकरी मुलांचे समीकरणच असते. पहिलीतल्या त्या चिमुकल्या मुलांना बालवाडीत असताना शाळेचे आकर्षण असते खरे मात्र शाळेचा पहिला दिवस म्हटला की पालकांना जबरदस्तीने शाळेत घेवून जावे लागते. मात्र शासनाच्या ‘प्रवेशोत्सवा’च्या निमित्ताने मुलांमधील शाळेप्रती असलेली भीती बऱ्यापैकी दूर झाली आहे. पहिल्याच दिवशी होणारे शिक्षकांकडून होणारे स्वागताने या निरागस चेहऱ्यांना शिकण्याच्या प्रचंड उमेद निर्माण झालेली असते.विद्यार्थ्यांमधील भीती दूर होण्यास मदतशासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर होऊन त्यांना शाळेविषयी आस्था वाटू लागली आहे, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. प्रवेशोत्सव कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
‘प्रवेशोत्सवा’ने भारावले पहिलीकर
By admin | Published: June 15, 2016 11:51 PM