आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. 0५ : जिल्हा सर्वसाधारण योजनेखाली विविध विकास कामांवर मार्च २0१७ अखेर १३0 कोटी रुपये खर्च करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे. शंभर टक्के निधी खर्च केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कार्यान्विन यंत्रणांच्या अधिकारी वर्गाचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वित्त व गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर होते.जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सभागृहात आयोजित या बैठकीस खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे आमदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक दीक्षीतकुमार गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी हरीबा थोरात व्यासपीठावर उपस्थित होते.
आठ क वर्ग पर्यटन स्थळांना मंजुरी
जिल्ह्यातील आठ क वर्ग पर्यटन स्थळांना या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
वेंगुर्ला तालुका : श्री देवी सातेरी मंदिर वेतोरे, कुडाळ तालुका : श्री साई मंदिर कविलगाव नेरुर, कणकवली तालुका : देवी कालीका मंदिर बोर्डवे व शिवराई मंदिर हळवल, मालवण तालुका : श्री देव रामेश्वर मंदिर बुधवले, श्री देव नारायण मंदिर बेलाचीवाडी, मसुरे बागवे मठ देऊळवाडी मसुरे, सावंतवाडी तालुका : श्री देव परमपूज्य सद्गुरदास भारतदास मठ व मारुती सेवा ट्रस्ट राघवेश्वर मंदिर, आंबोली.
आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी ४0 लाख ६0 हजार रुपये तर अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत ११ कोटी ८७ लक्ष ९0 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
वीज पुरवठ्याबाबत दक्षता घ्यावी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता वीज वितरण अधिका-यांनी घ्यावी, कृषी पंपाच्या वीज जोडण्या विहित वेळेत पूर्ण कराव्यात, चांदा ते बांदा योजने अंतर्गत प्रस्तावित कामे येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्याचे प्रयत्न करावेत, ज्या शाळा खोल्यांवर दरड कोसळण्याची शक्यता आहे अशा शाळा खोल्यांच्या ठिकाणी रिटर्निग वॉलची कामे तत्काळ हाती घ्यावीत. जिल्ह्यातील प्रस्तावित ८४ मोबाईल टॉवरची कामे गणपती उत्सवापूर्वी बी. एस. एन. एल विभागाने पूर्ण करावीत, सौर उर्जेद्वारे मासे सुकविण्याची योजना मत्स्यव्यवसाय विभागाने प्रस्तावित करावी आदी सूचना पालकमंत्री केसरकर यांनी या बैठकीत दिल्या.प्रारंभी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांनी इतिवृत्त वाचन केले.
बैठकीत सदस्य सर्वश्री काका कुडाळकर, अतुल काळसेकर, प्रकाश परब, अतुल नाईक, अभय शिरसाट तसेच शासकीय खाते प्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी दैनिक सागरचे संपादक निशीकांत जोशी यांचे निधना बद्दल तसेच जिल्ह्यातील शहिद झालेल्या जवानांना दोन मिनीट स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली.