मंडणगड : स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक झालेल्या मंडणगड नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिलेला मिळणार आहे. सोमवारी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये हे पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. सत्ताधारी महाआघाडीत राष्ट्रवादीच्या चार आणि काँग्रेसच्या चार अशा आठ महिला असून, राष्ट्रवादीची एकूण सदस्य संख्या नऊ असल्याने पहिले नगराध्यक्षपद राष्ट्रवादीच्याच वाट्याला येणार, हे निश्चित आहे.नगराध्यक्षपदाची आरक्षणे सोमवारी मुंबईत निश्चित करण्यात आली. यामध्ये मंडणगडचे नगराध्यक्षपद साधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. महाआघाडीमधून आठ महिला विजयी झाल्या आहेत. महाआघाडीत त्यांच्या शब्दाला किंमत असल्याने आमदार संजय कदम आता नगराध्यक्षपदाची धुरा कोणाकडे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ मात्र, आतापर्यंत एकाही महिलेने नगराध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केलेले नाही.नगरपंचायत निवडणुकीत महाआघाडीत एकूण आठ महिला विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार, तर काँग्रेसच्या चार महिलांचा समावेश आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वडीलबंधूची भूमिका बजावली आहे. निवडून आलेल्या सोळा नगरसेवकांमध्ये नऊ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असण्याची शक्यता अधिक आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरती तलार, श्रुती साळवी, प्रियांका शिगवण या राजकारणात नव्या आहेत, तर नेत्रा शेरे यांनी याआधी सरपंचपद भूषविलेले आहे. काँग्रेसमधून निवडून आलेल्या श्रद्घा लेंडे, स्नेहल मांढरे यांनी या आधीही ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशीब अजमावले आहे. त्यांना राजकारणाची ओळख आहे, तर बेबी गोरे, वैशाली रेगे या राजकारणात पूर्णपणे नव्या आहेत. त्यामुळे त्यांची शक्यता धूसर आहे.अध्यक्षपद निवडीची सूत्रे आमदार कदम यांच्याकडे असल्याने ते आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. वैभववाडीत खुले, दोडामार्गात ओबीसीनगराध्यक्षपद आरक्षण जाहीर झाले असून, वैभववाडीसाठी खुले, तर दोडामार्गात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे दोडामार्गात युतीचा, तर वैभववाडीत कॉँग्रेसचा नगराध्यक्षपद बसणार असल्याचे स्पष्ट झाले. अनुसूचित जागेसाठी आरक्षण न पडल्याने वैभववाडीत कॉँग्रेसचा जीव भांड्यात पडला. (प्रतिनिधी)
मंडणगड नगराध्यक्षपदाचा पहिला मान महिलेला
By admin | Published: November 09, 2015 11:07 PM