सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषद मालकी असणाऱ्या जिल्ह्यातील आठ तलावांमध्ये मत्स्यशेती केली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरूवारच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत घेण्यात आला. यात तुळसुली-तळेवाडी, पाट, वालावल, कसाल, पिंगुळी, कोळोशी, परबवाडा-दाडाचे तळे, उभादांडा-आडाळी या तलावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, विषय समिती सभापती प्रीतेश राऊळ, सायली सावंत, शारदा कांबळे, सदस्य संजय आंग्रे, मायकल डिसोजा, उत्तम पांढरे, रेश्मा कोरगांवकर, सावी लोके, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील आठ तलावांमध्ये मत्स्यशेती करून त्याचा लिलाव करुन ठेकेदारांमार्फत येणारे लाखो रुपये जिल्हा परिषदेला मिळणार आहेत. या तलावांमध्ये मत्स्यबीज सोडावे असा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून मालवण येथील मत्स्यसंवर्धन विभागाकडे सुपुर्द करण्यात आला आहे. त्यानुसार मत्स्यसंवर्धन विभाग या तलावामध्ये मत्स्यबीज सोडून साधारणत: पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीनंतर मासे विक्री योग्य झाल्यानंतर ‘त्या’ माशांचा लिलाव केला जाणार आहे. लिलावाच्या माध्यमातून मिळणारे लाखो रुपये जिल्हा परिषदेला मिळणार आहेत. हा मुद्दा लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी उपस्थित केला. या चर्चेत उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)या तलावांमध्ये होणार मत्स्यपालनकुडाळ तालुक्यातील तुळसुली-तळेवाडी, पाट, वालावल, कसाल, पिंगुळी, कणकवली तालुक्यातील कोळोशी तर वेंगुर्ले तालुक्यातील परवबवाडा-दाडाचे तळे, उभादांडा-आडाळी या आठ तलावांचा यात समावेश आहे. यात ५ सिंचन, तर ३ पाझर तलाव आहेत.
आठ तलावांत मत्स्यशेती
By admin | Published: April 28, 2017 12:51 AM