मालवण : अलीकडील काही वर्षात मच्छिमारात ताण-तणाव वाढीस लागल्याचे चित्र आहे. मच्छिमारांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असून, त्यांच्या जीवनशैलीत बरेचसे बदल झाले आहेत. यातूनच आजारांना निमंत्रण मिळत असून, किनाऱ्यावरील दहापैकी सहा मच्छिमारात मधुमेहाचे प्रमाण दिसून येत आहे. तसेच हृदयविकार व रक्तदाबासारखे आजारही बळावत आहेत.याचा विचार करूनच रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टने मच्छिमार बांधवांना आजारापासून मुक्ती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात मच्छिमार बांधवांसाठी निरोगी मच्छिमार अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. विवेक रेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.हे अभियान मालवण येथील रेडकर हॉस्पिटल येथे १६ डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक मच्छिमारांची मोफत तपासणी करण्याचा मानस डॉ. रेडकर यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गातील प्रामुख्याने किनारपट्टी भागात राहणाऱ्या मच्छिमारात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्या दूर करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रामुख्याने मालवण, देवगड व वेंगुर्ले या किनारपट्टी भागात ही मोहीम राबविली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात मधुमेह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात किनारपट्टीवरील मच्छिमारांचे प्रमाण अधिक आहे. त्यावर नियंत्रण मिळवत मच्छिमारांच्या आरोग्य समस्या निवारण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. या मोहिमेत देवगड येथे डॉ. किरण हिंदळेकर, कोचरा-निवती-नेरूर याठिकाणी डॉ. राजहंस मलगुंडे, वेंगुर्ले-रेडी भागात मोहन जगताप, आरोंदा येथे डॉ. भूषण साटम हे या अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहिती डॉ. रेडकर यांनी दिली. (प्रतिनिधी)दांडी येथे होणार प्रारंभयेत्या आठ दिवसांत या मोहिमेचा प्रारंभ मालवण दांडी येथून केला जाईल. गुरुवार ते रविवार दरदिवशी २५ याप्रमाणे आठवड्यात १०० मच्छिमारांची तपासणी होणार आहे. या तपासणीचा अहवाल तयार करून त्यावर संशोधन प्रबंध शासन स्तरावर पाठवण्यात येईल व मच्छिमारांसाठी आरोग्य धोरण निश्चितीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. यावेळी नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे सदस्य रवीकिरण तोरसकर, डॉ. दर्शन खानोलकर उपस्थित होते.
मच्छिमारांसाठी ‘निरोगी मच्छिमार अभियान’
By admin | Published: December 11, 2015 9:32 PM