मालवण : आचरा बंदर येथील अनधिकृत मिनीपर्ससीन व पारंपरिक मच्छिमार यांच्यातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील मासेमारी गेले चार दिवस कोलमडली आहे. पोलिसांनी २५० मच्छिमारांवर गुन्हे दाखल केल्यानंतर अटकेची कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून धरपकड मोहीम सुरू असल्याने किनारपट्टीवरील शेकडो मच्छिमार भूमिगत आहेत. त्यामुळे मासेमारी नौका किनाऱ्यावर उभ्या असल्याने मासेमारीच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. पोलिसांच्या अटकेच्या कारवाईमुळे मच्छिमार कुटुंबे धास्तावली आहेत. अटक होईल या भीतीने मालवण दांडी, वायरी, तळाशील, धुरीवाडा, आचरा आदी किनारपट्टीवरील भूमिगत अवस्थेत गेले आहेत. रोज शेकडोंच्या संख्येने समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या मच्छिमारांच्या नौका किनाऱ्यावरच उभ्या असून व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. ट्रॉलर्स तसेच अन्य पद्धतीने उपलब्ध होणारी मासळी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. मात्र, लिलाव पद्धतीने मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून होणारी खरेदी व जिल्ह्याबाहेर होणारी माशांची वाहतूक आवक घटल्याने ठप्प झाली आहे. त्यामुळे दिवसाला सुमारे लाखो रुपयांची उलाढाल होणारा मासळी व्यवसाय गेले चार दिवस ठप्प झाला आहे. मच्छिमारांतील संघर्ष असाच सुरू राहिल्यास व दिवाळी पर्यटन हंगाम पाहता मासळीचे दरही गगनाला भिडण्याची भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
मालवणात मासेमारीचे अर्थकारण कोलमडले
By admin | Published: November 05, 2015 10:30 PM