मालवण : नीलक्रांती विविध कृषी मत्स्य, पर्यटन व पत सेवा सहकारी संस्थेच्या पुढाकारातून आणि उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या सहकार्याने प्रगतशील शेतकरी भूषण सुर्वे यांनी कांदळगावातील माळरानावरील कातळावर साकारलेला मत्स्यसंवर्धन आणि मत्स्यशेतीचा जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प यशस्वी ठरला आहे.
पावसाळी हंगामात कातळावरील तलावात कटला आणि रोहू जातीची ३० हजार मत्स्यबीजे सोडण्यात आली होती. या प्रकल्पातून सुमारे १० हजार एवढे मत्स्यबीज उपलब्ध होईल, अशी माहिती मुळदे येथील शास्त्रज्ञांनी दिली आहे. मत्स्यशेतीची प्रायोगिक चाचणी तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत १९ आॅगस्ट रोजी करण्यात आली होती.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यसंशोधन व महाविभाग मुळदे, कुडाळ आणि येथील नीलक्रांती मत्स्यपर्यटन सहकारी संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने कांदळगाव येथील शेतकरी सुर्वे यांच्या खासगी मालकीच्या जमिनीत पावसाळी हंगामात जांभ्या कातळाच्या हंगामी तलावात गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा उपक्रम हाती घेतला. माळरानावर सुमारे दीड एकर क्षेत्रफळाच्या आणि सहा फूट खोलीच्या तळ्यात ही चाचणी घेतली होती.सप्टेंबर २०१९ ते जानेवारी २०२० मध्ये मत्स्यबिजाची वाढ आणि जगण्याचे प्रमाण यांची तपासणी मुळदे येथील मत्स्य शास्त्रज्ञांनी केली होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या मत्स्यबीजाची अंशत: काढणी करण्यात आली.
पहिल्याच प्रयत्नात सुमारे १७५० वाढलेली मत्स्यबीज तळ्यातून काढून जिवंत स्थितीत धामापूर येथील तलावात सोडण्यात आली. काढणीच्यावेळी केलेल्या पाहणीत तळ्यातून सुमारे १० हजार नग मत्स्यबीज मिळेल असे दिसून आले.
उरलेल्या बिजाची काढणीही लवकरच होणार आहे. प्राथमिक काढणीत ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. कातळावर साचणाऱ्या पाण्यात मत्स्यजीवाची वाढ आणि जगण्याचे प्रमाण तपासून अशा प्रकारचा उपक्रम यशस्वी होऊ शकतील, असे आशादायी निष्कर्ष विद्यापीठ शास्त्रज्ञ व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या काढले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार सादरीकरणगोड्या पाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धनात प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत व त्यांचे सहकारी डॉ. मनोज कुगुरुवार, कृपेश सावंत यांनी मागील चार ते पाच महिने त्यांची निरीक्षणे वेळच्या वेळी नोंदवून चाचणी यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदविला.
जिल्ह्यात वा अन्य भागात याचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे तोरसकर यांनी सांगितले. या उपक्रमाचे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या अनुदानित योजनांमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्मिता केळुसकर यांनी सांगितले.हंगामी काळात उत्पन्नाचा स्रोतमत्स्यबिजाची वाढ सरासरी १०० ग्रॅम प्रतिनग एवढी मिळाली. डिसेंबर महिन्यात पूरसदृश परिस्थितीत या तळ्यातील सुमारे ४ ते ५ हजार नग मत्स्यबीज वाहून गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अंदाजे दहा हजार नग मत्स्य तळ्यातून प्राप्त होण्याचे चित्र आहे.
हा अभिनव उपक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून अन्य ठिकाणी हा उपक्रम भविष्यात राबविण्यास शेतकऱ्यांना हंगामी काळात एक पर्यायी महत्त्वाचा उत्पन्न स्रोत निर्माण होऊ शकेल. कोकण प्रांतात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या उपक्रमात नीलक्रांती संस्थेचे प्रमुख रवीकिरण तोरसकर यांचे मोलाचे योगदान राहिले.