मालवण : समुद्रात खुलेआम सुरू असलेल्या एलईडी मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छिमारांनी ‘टोकाची’ भूमिका घेतली असतानाही सिंधुदुर्ग किनारपट्टीवर एलईडी मासेमारी धुमाकूळ घालत आहे. सध्या निवडणुकांच्या कामात व्यस्त असणाºया मत्स्य विभागाच्या अधिकाºयांनी शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कौतुकास्पद कामगिरी केली आहे. देवबाग समुद्रात एलईडी पद्धतीने मासेमारी करणाºया नौकेला मत्स्य विभागाच्या ‘शीतल’ या गस्तीनौकेने जेरबंद केले. ही पर्ससीन नौका गोवा येथील आहे.
दरम्यान, नौकेतील खलाशांसह सर्व साहित्य मत्स्य विभागाने ताब्यात घेतले आहे. ही नौका मालवण बंदरात आणून अवरुद्ध करून ठेवण्यात आली आहे. या नौकेचा पंचनामा करून कारवाईसाठी सोमवारी तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती परवाना अधिकारी सतीश खाडे यांनी दिली.
मत्स्य विभागाने रात्रीच्या वेळी प्रभावी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास देवबाग समुद्रात ११ नॉटिकल अंतरात गोव्यातील एक पर्ससीन नौका मासेमारीच्या तयारीत असल्याचे मत्स्य विभागाच्या शीतल गस्तीनौकेला दिसून आले. त्यामुळे धडक कारवाई करीत ही नौका पकडण्यात आली. मत्स्य विभागाच्या शीतल गस्तीनौकेतून मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी सतीश खाडे, सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त, रवींद्र मालवणकर, पोलीस कर्मचारी महेंद्र महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.तहसीलदारांकडे कारवाईचा प्रस्तावनौका तपासणीत पर्ससीनचे जाळे, १२ एलईडी बल्ब आढळून आले. हे सर्व साहित्य, खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. नौका जप्त करीत त्यावरील स्टेअरिंग व्हील काढून अवरुद्ध करण्यात आला आहे. मत्स्य विभागाचे कर्मचारी नौकेवर नियंत्रण ठेवून आहेत. याकामी पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. नौकेचा पंचनामा पूर्ण करून सोमवारी नौकेचा कारवाई प्रस्ताव मालवण तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे, असे मत्स्य विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.