नरेंद्र बोडस ल्ल देवगड जुनी पिढी कशीतरी तग धरून आहे पण सध्याच्या काळातील निराशाजनक अवस्था बघून आमची पुढची पिढी या मच्छिमारी धंद्यात उतरणे अशक्य वाटते, अशा शब्दात मच्छिमार नेते व जाणकार भाई खोबरेकर यांनी सरत्या मच्छिमारी हंगामाचा आढावा घेतला. या हंगामात सुरुवातीला काही बोटींना निर्यातक्षम म्हाकूळ मिळाले. मात्र नंतरच्या काळात निर्यातक्षम अशी राणा, म्हाकूळ व बळा अशी मासळी मिळालीच नाही. काही काळ व काळी प्रमाणात चिंगुळ मिळाले. म्हणूनच या हंगामात मच्छिमार जेमतेम तग धरू शकला आहे. एकंदर हंगाम निराशाजनक गेला असे म्हणावे लागेल. यावर्षी काही मच्छिमारांनी बोटीचा वेग वाढविण्यासाठी व इंजिन क्षमता वाढविण्यासाठी नवीन इंजिने बदलून घेतली. मासळीचा पाठलाग करून जाळे टाकल्यानंतर त्यांच्या वेगापेक्षा अधिक वेगाने बोटी पळवून त्यांना जाळ्यात पकडावे लागते. यासाठी ही व्यवस्था केली. परंतु त्याचा पुरेसा फायदा मच्छिमारांना झाला नाही. कारण मासळीचे प्रमाणच अत्यल्प होते. देवगड बंदरामध्ये सुमारे ३०० मोठ्या व मध्यम यांत्रिकी नौका आहेत. तर सुमारे १५० पाती नौका आहेत. यामध्ये मच्छिमारी समाज ८० टक्के तर अन्य प्रवर्ग २० टक्के गणता येईल. म्हणजे सुमारे २ हजार ते २५०० मच्छिमारी बांधव मच्छिमारीत गुंतलेले आहेत. प्रत्येक बोटीवर तांडेल नं. १ - पगार १४ ते १५ हजार, तांडेल नं. २ - पगार ७ ते साडेसात हजार व खलाशी वर्ग प्रत्येकी साडेपाच हजार असा पगार द्यावा लागत आहे. डिझेल प्रति लिटर ६४.५० इतका दर आहे. बर्फ १२०० रुपये टन इतका पडतो. या पुढील काळातही महागाईचा चढा दर, वाढते पगार लक्षात घेता प्रत्येक बोटीमागे ४० ते ४५ लाख रुपयांचा धंदा होणे गरजेचे आहे. तरच मच्छिमारी नुकसानीमध्ये जाणार नाही. अन्यथा तोट्यात जावून मच्छिमारी करणे अशक्य बनेल. बहुतांश नौका मच्छिमारीसाठी समुद्रात उतरवणेसुद्धा मच्छिमारांना जमणार नाही, अशी भीती भाई खोबरेकर यांनी बोलताना व्यक्त केली.
सरता मच्छिमार हंगाम निराशाजनक भाई खोबरेकर
By admin | Published: May 24, 2014 1:02 AM