देवगड : सागरी सुरक्षिततेची जबाबदारी ही मच्छिमारांवर अवलंबून असते. देशाचे नागरिक या नात्याने त्यांनी संशयास्पद बोटी, संशयास्पद वस्तूंची माहिती सुरक्षा यंत्रणेला देणे महत्त्वाचे आहे. मच्छिमारांकडून सहकार्य मिळणे हे महत्त्वाचे आहे, असे मत नौदलाचे अधिकारी स्वराज महापात्रा यांनी व्यक्त केले. तारामुंबरी मच्छिमार संस्थेच्या सभागृहात मच्छिमार व सागरी सुरक्षा दलाच्या सदस्यांना नौदलामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी देवगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, मत्स्य परवाना अधिकारी सुर्वे, नौदल विभागाचे एम. जे.शहाजी, मच्छिमार नेते भाई खोबरेकर, देवगड मच्छिमार संस्थेचे चेअरमन व्दिजकांत कोयंडे, चंद्रकांत पाळेकर, विनायक प्रभू, अयण तोरसकर, आदी उपस्थित होते. यावेळी महापात्रा म्हणाले की, मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी आलेले अतिरेकी हे सागरी महामार्गानेच आले होते. त्यानंतर सागरी सुरक्षिततेवर शासनाने लक्ष केंद्रीत केले असून, अनोळखी व संशयास्पद नौका आढळल्यास मच्छिमारांनी तत्काळ सुरक्षा यंत्रणेला कल्पना द्यावी. समुद्राचा गैरवापर करून अतिरेकी या मार्गानेच प्रवेश करून हल्ले करत आहेत. याची दखल सर्वांनीच घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. मच्छिमार नेते भाई खोबरेकर म्हणाले की, मच्छिमारांकडून सुरक्षा यंत्रणेला सहकार्य केले जाते आणि यापुढेही केले जाणार आहे. मात्र सुरक्षा यंत्रणेकडून मच्छिमारांना सहकार्य मिळत नसल्याची खंत खोबरेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
मच्छिमारांकडून सहकार्य आवश्यक
By admin | Published: August 10, 2015 8:37 PM