रत्नागिरी : राज्य शासनाने डॉ. सोमवंशी अहवालाच्या आधारे पर्ससीनद्वारे होणाऱ्या मच्छीमारीवर बंदी घातली आहे. याविरोधात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीननेटधारक मच्छीमारांनी गेल्या महिन्यात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र, त्यानंतरही शासनाला जाग आलेली नाही. या पार्श्वभूमीवर १० मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मच्छीमारांनी आत्महत्या करण्याची वाट शासन बघतेय का? असा संतप्त सवाल शनिवारी रत्नागिरीत झालेल्या पर्ससीननेटधारक मच्छीमारांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सोमवंशी शिफारशींच्या आधारे पर्ससीननेटद्वारे होणाऱ्या मच्छीमारीवर प्रतिबंध घातला आहे. केवळ यांत्रिक नौकेचा वापर सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत करावा, नाहीतर कारवाई करण्यात येईल, असा आदेश देण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांनी २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत मच्छीमारी करण्यास परवानगी दिली, तर मुळातच मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या मच्छीमारांवर संकटाचा डोंगरच कोसळेल, असा आरोप यावेळी मच्छीमारांनी केला होता.भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी या मोर्चाच्यावेळी पर्ससीननेटधारक मच्छीमारांच्या बाजूने उभे राहून मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जावून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मच्छीमारांना दिले होते. त्यानंतर मच्छीमारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र, भेट न झाल्याने त्यांना हात हलवतच परत यावे लागले. या मोर्चाचे राजकीय भांडवलही विविध पक्षांनी केले. दोन आठवडे उलटूनही मच्छीमारी बंदीबाबत निर्णय न झाल्याने मच्छीमारी ठप्प आहे. साहजिकच कोट्यवधी रुपयांचे नुकसान मच्छीमारांना सोसावे लागत आहे.मच्छीमारांच्या प्रश्नांची शासनाने गंभीर दखल घेतली नसल्याने आता राज्यातील सर्वच मच्छीमार एकवटले असून, १० मार्च रोजी आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरी तालुका मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष शरीफ दर्वे यांनी दिली. मराठवाडा, विदर्भ या भागात दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, पर्ससीननेटधारक मच्छीमारीवर घातलेल्या बंदीमुळे कोकणातील बंदीमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्जबाजारी होऊन मच्छीमारांनी आत्महत्या करण्याची वाट शासन पाहात आहे का? असा सवाल शनिवारी झालेल्या मिरकरवाडा येथील बैठकीत मच्छीमारांनी उपस्थित केला. आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात संपूर्ण राज्यातील मच्छीमार एकवटणार असून, रत्नागिरी तालुक्यातील मिरकरवाडासह राजापूर तालुक्यातील नाटे, साखरीनाटे परिसरातील मच्छीमार सहभागी होणार आहेत. पर्ससीननेटवरील मच्छीमारी बंदीमुळे मच्छीमारांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.या व्यवसायावर अवलंबून असणारे खलाशी, विक्रेते तसेच छोटे-मोठे मच्छीमार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मासळी बाजरपेठ ठप्प झाली आहे. पूर्ण कोकणपट्ट्यातील मासळीच्या बाजारपेठांवर बंदीचे सावट पसरले आहे. त्यामुळे शासनाने पर्ससीनधारक मच्छीमारांवर केलेला अन्याय दूर करावा व आम्हाला न्याय द्यावा अन्यथा १० मार्च रोजी कोकणातील मच्छीमार आझाद मैदानावर मोर्चा काढून धडकणार असल्याचे दर्वे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पर्ससीननेटधारक काही आजचे नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आता बंदी घालून या व्यावसायिकांचे नुकसान केल्याचा या मच्छिमारांचा दावा आहे.
मच्छीमार होणार पुन्हा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2016 10:11 PM