मालवण : परराज्यातील हायस्पीड व पर्ससीन ट्रोलर्सचा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा धुमाकूळ सुरू झाला आहे. जिल्ह्यातही विनापरवाना पर्ससीन मासेमारी सुरूआहे. तसेच स्थानिक मच्छिमारांच्या मागण्यांसाठी मालवण दांडी येथील महेंद्र पराडकर या मच्छिमाराने समुद्र्रात छेडण्यात येणारे बेमुदत उपोषण मालवण तहसीलदार व मस्त्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तूर्त मागे घेतले आहे. मात्र, कारवाई न झाल्यास पूर्वसूचना न देता समुद्रात बेमुदत उपोषण आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पराडकर यांनी दिला आहे. छोट्या व पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय होत आहे. मत्स्य विभाग कारवाई करीत नाही. असे सांगत महेंद्र पराडकर यांनी १ आॅक्टोबरपासून समुद्रात छेडण्यात येणारे बेमुदत उपोषण तडकाफडकी ५ सप्टेंबरला करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हडबडलेल्या प्रशासनाने आंदोलन मागे घेण्यासाठी पराडकर यांना विनवणी केली. शनिवारी तहसीलदार वनिता पाटील, मत्स्य अधिकारी, पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, आदी प्रशासन प्रमुखांनी पराडकर यांची भेट घेतली. त्यानंतर मत्स्य विभागाने तत्काळ विनापरवाना व परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तहसीलदार यांनी समुद्रात किंवा किनाऱ्यावर मासेमारी करतानाच नव्हे तर मासेमारीच्या उद्देशाने असणाऱ्या ट्रॉलर्सवर कारवाईचे प्रस्ताव सादर करा अशा सूचना मत्स्य विभागास केल्या.मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावादरम्यान, पराडकर यांनी २००९ साली झालेल्या फयान वादळात नुकसानग्रस्त ७०० हून अधिक मच्छिमारांचे पंचनामे झाले. त्यांना मदत स्वरुपात ४०० कोटींची तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची मागणी मान्य झाली. मात्र, काही मच्छिमारांनाच १२५ कोटींच्या आसपास मदत मिळाली. अन्य रक्कम मागे गेली. आता भाजप सरकारमधील महसूल तथा मत्स्योद्योग मंत्री एकनाथ खडसे त्यांनी या मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावा. मत्स्य विभागाने सहकार्य करावे, अशीही मागणी पराडकर यांनी केली आहे. यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, हरी खोबरेकर यांच्यामार्फत आमदार वैभव नाईक यांच्याशी पराडकर यांनी चर्चा केली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार नाईक यांनी याबाबत मत्स्य मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी बैठक घेण्याचे आश्वासन पराडकर यांना दिले. (प्रतिनिधी)
मच्छिमारांचे उपोषण तूर्त मागे
By admin | Published: September 06, 2015 8:55 PM