रत्नागिरी : मुस्लिम मच्छीमार दालदी समाजाला जातीचे दाखले मिळविण्यासाठी ‘सेतू’ कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. हे दाखले आता चौकशीच्या गर्तेत अडकले असल्याने मच्छीमार हैराण झाले आहेत. एकही लोकप्रतिनिधी दालदी समाजाची अडचण सोडविण्यास पुढे येत नसल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुस्लिम मच्छीमार दालदी समाजाला इतर मागासवर्गीयांचे दाखले हे सहजासहजी मिळत नाहीत. समाजाकडे योग्य नेतृत्व नसल्याने या समाजाला दाखल्यांसह इतर शासकीय कामांमध्ये अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. अनेकदा कागदपत्रांची पूर्तता असतानाही जाणिवपूर्वक एखादा कागद पाहिजे, असे सांगून दाखला देण्यास सात ते आठ महिने विलंब केला जात आहे. त्यामुळे ‘सेतू’चे उंबरठे झिजवून यातील अनेक जणांनी दाखला मिळवण्याचा नादच सोडून दिला आहे. गरीब, गरजू आणि विकासापासून नेहमीच वंचित राहिलेल्या या समाजाला आता जातीचा दाखला मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तलाठी चौकशी करताना यापूर्वी तलाठ्याकडे लाभार्थी अर्ज हातीच घेऊन जात असे. मात्र, आता तलाठी चौकशीसाठी हा अर्ज ‘सेतू’ कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर तो टपालातून त्या-त्या तलाठ्यांकडे चौकशीसाठी जातो. मात्र, एका तलाठी चौकशीसाठी दोन ते तीन महिने जात असल्याने दाखल्यासाठी उशिर होतो. यासाठी तलाठी चौकशी पूर्वीच्याच पध्दतीने करण्यात यावी, अशी मागणी दालदी समाजाकडून करण्यात आली आहे. जेणेकरुन दाखला मिळण्यास उशिर होणार नाही.मच्छीमार दालदी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला जात असल्याची प्रतिक्रिया या समाजामधून उमटत आहे. जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असतानाही या समाजाला ‘सेतू’ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. समाजाला दाखल्यांसाठी येणारी ही समस्या अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मांडण्यात आली. मात्र, त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे मुस्लिम मच्छीमार दालदी समाजाचे म्हणणे आहे. (शहर वार्ताहर)
जातीच्या दाखल्यांसाठी मच्छीमारांची पायपीट
By admin | Published: March 22, 2016 12:27 AM