मालवण : किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावत असलेला पोलीस मित्र अर्थात सागर रक्षक मच्छिमार असुरक्षित बनला आहे. शेकडो सागर रक्षकांच्या मासेमारी व्यवसायावर परप्रांतीयांचे अतिक्रमण होत आहे. परप्रांतीय हायस्पीड-पर्ससीन मासेमारांकडून पैसे घेऊन अवैध मासेमारीस चालना दिली जात आहे. मत्स्य विभागाचे अधिकारी भ्रष्ट बनले असल्याचा गंभीर आरोप सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी बैठकीत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांच्यासमोर केला. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध प्रकार होत असतील तर किनारपट्टीवरील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी कोणत्याही वेळी गस्त घालून अवैध प्रकार रोखावेत अशा सूचना केल्या. अपुरा कर्मचारी वर्ग असला तरीही कुशल नौका नसताना मत्स्य विभागाकडून दिवस-रात्र गस्तीच्या माध्यमातून होत असलेल्या कारवाईबाबतही पोलीस अधीक्षकांनी समाधान व्यक्त केले. मालवण कुंभारमाठ येथील जानकी मंगल सभागृहात जिल्ह्यातील सागर रक्षक दल तसेच किनारपट्टीवरील मच्छिमार प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सागर रक्षक दलाचे सदस्य यांना हिवाळी चादर वाटप करण्यात आले. यावेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, किनारपट्टीवरील ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सागर रक्षक उपस्थित होते. प्रशासनाने सागर रक्षक दल भरतीबाबत देण्यात आलेल्या जाहिरातीत अनेक अडचणी आहेत. स्थानिकांना डावलून घाटमाथ्यावरील कोणी समुद्राची माहिती नसलेला सुरक्षा रक्षक म्हणून भरती झाल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य मिळावे असे सर्जेकोट येथील मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष गंगाराम आडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)देवबाग येथे अवैध दारू ?सागर रक्षक भाई मांजरेकर यांनी कर्ली खाडी येथून कुडाळ, वेंगुर्ले हद्दीतून देवबाग येथे गोवा बनावटीची अवैध दारू येत असून यासाठी बोटींचा वापर होतो. ही अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी सातत्याने सांगूनही पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असे मांजरेकर यांनी सांगितले. वाढते परप्रांतीय लोंढे रोखण्याबाबतही मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली. अधीक्षकांचे आवाहन : सर्वांनी असेच सहकार्य करागेले काही वर्षे परप्रांतीय ट्रॉलर्स सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धुडगूस घालत आहे. मत्स्य विभाग यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याने मच्छिमारच त्यांना पकडत असल्याचे मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेवरच आरोप करताना देवगड येथील सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी सांगितले. २२ वर्षे पोलीस मित्र म्हणून काम करताना ना मानधन, ना कोणताही लाभ मिळत नाही. प्रसंगी बैठकांना स्वत:चेच पैसे खर्च करून यावे लागते अशी खंत सागर रक्षकांनी व्यक्त केली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शासनाकडून सागर रक्षक दल ही योजना स्वयंसेवक धर्तीवर आहे. त्यामुळे कोणतेही मानधन अथवा भत्ता देण्याची योजना नसल्याचे स्पष्ट करत सुरक्षा दलाचे सदस्य चांगले काम करत आहेत. सर्वांनी असेच सहकार्य करावे असे आवाहनही केले. किनारपट्टीवर हे सदस्य पोलीस दलाचे कान आणि डोळे आहेत. सदस्यांनी सुचवलेल्या सूचनांबाबत योग्य कारवाई केली जाईल असे शिंदे यांनी सांगितले.
मत्स्य अधिकारी बनले भ्रष्ट
By admin | Published: October 23, 2015 9:42 PM