सावंतवाडी : आरोंदा किरणपाणी खाडीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या प्रकाश भिवा मालवणकर (वय ५१, रा. तळवडे) यांचा साथीदाराबरोबर झालेल्या किरकोळ वादातून खून झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. प्रकाश यांचा खून सिकंदर मालवणकर (४८, रा. महाळ्येवाडी तळवडे) या त्याच्याच मित्राने केल्याने त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.तळवडे येथील प्रकाश मालवणकर व सिकंदर मालवणकर हे दोघे बुधवारी (दि. २५) सायंकाळी ६ वाजता आरोंदा येथे मच्छिमारीसाठी गेले होते. तेथे पहिल्यांदा सिकंदर हा आरोंदा खाडीपात्रात मासेमारी करीत होता, तर प्रकाश हे पुलावर बसले होते. सायंकाळी उशिरापर्यंत दोघेही आरोंदा खाडीपात्राच्या जवळपास होते. काही स्थानिक ग्रामस्थ मासेमारीसाठी गेले होते. त्यांनीही या दोघांना पाहिले होते.रात्री आठनंतर या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली व त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी सिकंदर याने(पान ३ वरून) प्रकाश यांच्या डोक्यात बुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच काही जखमा प्रकाश यांच्या पाठीवरही होत्या. त्यानंतर सिकंदर याने प्रकाश यांना खाडीत ढकलून तो तळवडे येथे घरी निघून आला. रात्री उशिरापर्यंत याची कोणतीही कल्पना घरी किंवा आजूबाजूच्या ग्रामस्थांना दिली नाही. प्रकाश घरी आले नसल्याने, त्यांचा मुलगा प्रीतम मालवणकर याने ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यावेळी सिकंदर हा प्रकाशसोबत होता, असे ग्रामस्थांना समजले. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता, सिकंदरने प्रकाश खाडीत पडला. मी घाबरून याची माहिती कुणाला दिली नाही, असे स्पष्ट केले.त्यानंतर ग्रामस्थांनी आरोंदासह परिसरात पाहणी केली. तसेच तेरेखोल येथील मच्छिमारांनी रात्रभर शोधाशोध केली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास प्रकाश मालवणकर यांचा मृतदेह तेरेखोल खाडीपात्रात मच्छिमारांना आढळून आला. त्यानंतर याची माहिती तळवडे ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मळेवाड आरोग्य केंद्रात पाठविला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केली. नंतर प्रकाश यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रकाश हे शेतकरी असून त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. तळवडत खळबळप्रकाश मालवणकर हा आरोंदा खाडीत बुडला अशीच चर्चा तळवडे गावात सुरुवातीला होती. मात्र, गुरुवारी प्रकाश यांचा त्याच्याच मित्राने खून केला, अशी बातमी जेव्हा धडकली तेव्हा गावात एकच खळबळ उडाली.
मासेमारीसाठी नेऊन मित्रानेच केला घात
By admin | Published: November 26, 2015 11:29 PM