प्रकाश वराडकर -- रत्नागिरी -केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने मासेमारी व्यवसायाला जबर फटका बसला आहे. गेल्या चार वर्षांपासून सतत नैसर्गिक संकटात सापडलेला हा व्यवसाय आता बाद नोटांच्या जाळ्यात आहे. व्यवसायासाठी चलनात आलेल्या नवीन नोटा व चलनातील इतर नोटांसाठी बॅँकांसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे नौका मालकांची चांगलीच दमछाक होत आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने मासेमारी व्यवसायाला नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. त्यातच गेल्यावर्षी पारंपरिक व पर्ससीन नेट मच्छीमारांमधील संघर्षातही मासेमारी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरू करण्याची नियमानुसार परवानगी मिळाली. परंतु सागरी पाण्याला असलेल्या करंटमुळे आॅगस्टमध्ये हंगाम फारसा चालला नाही. सप्टेंबरपासून मासेमारीला वेग आला. आॅक्टोबर तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम चांगला चाललेला असतानाच केंद्राने नोटाबंदी जाहीर केली. त्यामुळे व्यवसायासाठी आवश्यक असलेले चलन उपलब्ध नसल्याने मासेमारी व्यवसायाची कोंडी झाली आहे. याबाबत मच्छीमारी व्यावसायिकांनी माहिती दिली. बंद नोटांमुळे मासेमारी व्यवसायाला रोजच्या रोज लागणारे नवीन व जुन्या चलनातील पैसे मिळविणे हे मोठे जिकरीचे काम बनले आहे. त्यासाठी सातत्याने बॅँकांसमोरील रांगांमध्ये उभे राहून नवीन चलन वा चलनातील जुन्या नोटा मिळवाव्या लागत आहेत. दररोज मासेमारी नौकेसाठी सुमारे ३० हजारांचे डिझेल लागते. हे डिझेल मच्छीमारी सोसायट्यांमार्फत पुरविले जाते. त्यामुळे सोसायट्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटा स्वीकारत आहेत. परंतु दर दिवशीचा रोखीचा खर्च, दर आठवड्याला खलाशांना द्यावा लागणारा पगाराव्यतिरिक्तचा हप्ता आणि महिन्याचा पगार हा चालणाऱ्या नोटांमध्येच द्यावा लागतो. दर महिन्यात पहिल्या आठवड्यात हा पगार होतो. त्याचवेळी नोटा बंदी लागू झाल्याने खलाशांच्या पगाराची चलनी नोटांमध्ये व्यवस्था करताना व्यावसायिकांच्या नाकीदम आला आहे. दररोज प्रत्येक मासेमारी नौकेसाठी ३० हजारांचे डिझेल व शुक्रवारी लागणारे २० ते ३० हजार रुपये खलाशांचा हप्ता असे एकूण ५० ते ६० हजार रुपये खर्च शुक्रवार या एका दिवशी होतो. त्यावेळी डिझेल हे जुन्या चलनी नोटांदवारे होत असला तरी उर्वरित २० ते ३० हजार रुपये हे खलाशांना नवीन नोटा व चलनात असलेल्या जुन्या नोटांद्वारे द्यावे लागते. खलाशी जुन्या बंद नोटा स्वीकारत नाहीत. मिरकरवाडा जेटीवर दररोज सकाळी व सायंकाळी मिळणाऱ्या माशांपैकी १० टक्के मासे विक्री केले जातात. त्यातूनही दिवसाला २० ते २५ लाखांचा व्यवहार होतो. खवय्ये जेटीवर विविध प्रकारचे मासे किलोच्या भावात खरेदी करतात. मात्र गेल्या आठवडाभरात जुन्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने मासे विक्रीचे प्रमाणही घटले आहे. त्याचा फटका किरकोळ स्वरुपात मासे विकणाऱ्या विक्रेत्यांना बसला आहे. सुरूवातील दोन दिवस रद्द झालेल्या पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. परंतु बॅँकेत जाऊन नोटा बदलायच्या किती, अशी समस्या निर्माण झाल्याने जुन्या बंद झालेल्या नोटा स्वीकारण्यास विक्रेत्यांनीही नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरातील मासे विक्रीची उलाढाल मंदावली आहे. व्यापाऱ्यांना फटकामच्छीमारी व्यवसायावर अवलंबून असणारे अनेक छोटे व्यवसाय मिरकरवाडा जेटी परिसरात आहेत. अन्य बंदरांमध्येही असे व्यावसायिक आहेत. नोटा बंदीमुळे या व्यावसायिकांसमोर सुट्या पैशांची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. रत्नागिरीची बाजारपेठ ही मासेमारी व्यवसायातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर अवलंबून आहे. मात्र, पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्याने व जुन्या नोटा बदलून मिळणारी रक्कमही कमी असल्याने बाजारपेठांमध्येही आर्थिक उलाढाल कमी झाली आहे. नौका मालकांची होतेय दमछाकगेल्या आठवड्यात जुन्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने मच्छी विक्री घटली.किरकोळ स्वरुपात मासे विक्री करणाऱ्या मच्छीमारांनाही बसला फटका.नोटा बंदीमुळे व्यावसायिकांसमोर सुट्या पैशांची समस्या.जुन्या नोटा बदलण्यासाठी निर्बंध असल्याने आर्थिक उलाढाल मंदावली.
मासेमारी बाद नोटांच्या जाळ्यात
By admin | Published: November 17, 2016 10:03 PM