रत्नागिरी : शासनाने लादलेल्या पर्ससीन नेटवरील बंदीमुळे यापुढे मासेमारी हंगामामध्ये त्यांना केवळ तीन महिनेच मासेमारी करता येणार आहे. त्यामुळे उर्वरित सहा महिन्यांचे वेतन खलाशांना कसे अदा करावे? असा प्रश्न पर्ससीन नेटधारकांना सतावत आहे. त्यामुळे पर्ससीन नेटमालक कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागणार आहेत. पर्ससीन नेट मासेमारीवर जानेवारी ते मे महिन्यापर्यंत घातलेल्या बंदीमुळे पर्ससीन नेटधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील सुमारे ४०० पर्ससीन नेटधारकांनी या व्यवसायासाठी आपल्या आयुष्याची पुंजी लावली आहे. या बंदीमुळे पर्ससीन नेटधारकांचे भवितव्य अंधारमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पर्ससीन नेट मासेमारीवर अवलंबून असलेले अनेक जोडधंदे यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. माशांची वाहतूक करण्यासाठी अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी बँकांकडून कर्ज घेऊन टेम्पो खरेदी केले होते. आधीच कमी-जास्त प्रमाणात मासे मिळत होते. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेले टेम्पोमालक कर्जाच्या ओझ्याखाली बुडणार असल्याने कर्जाचे हप्ते कुठून भरणार? हा प्रश्न त्यांना सतावत आहे.डॉ. सोमवंशी समितीच्या अहवालाचा आधार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी ते मे अखेरपर्यंत पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावर बंदी घालण्याचा अध्यादेश काढला. ही बंदी लागू झाल्यानंतर पर्ससीन नेटधारकांनी शासन आदेशाचे पालन करुन आजपर्यंत मासेमारी बंद ठेवली. या बंदीमुळे त्यांचे संपूर्ण आर्थिक व्यवहारच ठप्प झाले आहेत. त्यांची आर्थिक कोंडी झाल्याने खलाशांचे पगार कसे अदा करावेत? तसेच बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडावेत? खलाशांचाही हप्ता कसा द्यावा? बँकांव्यतिरिक्त अन्य व्यापाऱ्यांचे देणे कसे द्यावे? असे अनेक प्रश्न पर्ससीन नेटधारकांसमोर उभे राहिले आहेत.वर्षभराच्या कालावधीमध्ये केवळ आठच महिने खोल समुद्रातील मासेमारी चालते. १५ आॅगस्टनंतर ही मासेमारी सुरु होत असली, तरी खऱ्या अर्थाने आॅगस्ट अखेरीस मासेमारीला सुरुवात होते. त्यातच पावसाळ्यानंतर होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये सुमारे महिनाभराचा कालावधी खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवावी लागते. शासनाने बंदी उठविण्याबाबत विचार न केल्यास पर्ससीन नेटधारकांना मासेमारीच्या हंगामात मासेमारीसाठी केवळ तीन महिनेच मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे.या बंदीमुळे पर्ससीन नेटधारकांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा स्थितीत अनेक पर्ससीन नेट नौकांवरील खलाशांनीही पलायन केले आहे. अनेक खलाशांना पर्ससीन नौकामालकांनी हजारो रुपये आगाऊ रक्कम दिली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. (शहर वार्ताहर)आर्थिक अडचण : हजारो मच्छीमार भीतीच्या छायेत...शासनाने पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावर बंदी घातल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. पर्ससीने नेटधारक केवळ याच व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्ससीन नेटने मासेमारी सुरु न झाल्यास हजारो मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत.-अकील भांडे, साखरीनाटे, राजापूर.प्रश्न ऐरणीवर...नैसर्गिक परिस्थिती मच्छीमारांच्या मुळावर उठलेली असताना दुसरीकडे आता शासनानेही पर्ससीन नेटद्वारे मच्छीमारीवर बंदी घातल्याने या व्यावसायिकांच्या व खलाशांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
केवळ तीन महिनेच मासेमारी
By admin | Published: March 20, 2016 9:29 PM