कणकवली : शहरातील महाजनी नगरातील पाच बंगले शुक्रवारी रात्रीत फोडण्यात आले. या घरफोडीत ऐवज चोरीस गेलेला नसून कोणीही तक्रार नोंदवलेली नाही. मात्र, शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबले नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण केले आहे. महाजनी नगरातील बाजूबाजूलाच हे बंगले आहेत. पाचपैकी तिघे शिक्षकांचे बंगले आहेत. रवींद्र गोविंद पाटील, राजेंद्र काळे, संभाजी लवंद, कांतिलाल पटेल, प्रल्हाद बलभीम धावरे यांचे बंगले फोडण्यात आले. मुख्य दरवाजाची कडी तोडून अज्ञातांनी आत प्रवेश केला आणि आतील कपाटेही उघडण्यात आली. मात्र, कोणत्याही बंगल्यातून ऐवज चोरीस गेला नसल्याचे समजते. यापैकी एका बंगल्यात किमती कॅमेरा, चांदीची भांडी सुरक्षित राहिली आहेत. त्यामुळे चोरट्यांचा रोकड चोरण्याकडे कल होता, अशी शक्यता आहे. यापैकी पटेल आणि धावरे यांच्या वरच्या मजल्यावर भाडेकरू असताना ही घरफोडी झाली आहे. नजीकच्या घरात कुत्रा बांधलेला होता. त्या घराला बाहेरून कडी लावण्यात आली होती. घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, उपनिरीक्षक चव्हाण यांनी स्वत: घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकही मागविण्यात आले. घरांमधील कपाटे उघडून आतील सामान विस्कटून टाकण्यात आले होते. (प्रतिनिधी) निरीक्षकांचीच गस्त कणकवली पोलिसांची गस्त शहरात नेहमी होत असते. शुक्रवारी रात्री पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे स्वत: गस्तीसाठी होते. महाजनी नगरातही त्यांनी गस्त घातली होती; मात्र तरीही घरफोडी झाली. युवकाचा संशयास्पद वावर शुक्रवारी दुपारी या परिसरात घरफोडीप्रकरणात सहभागी संशयास्पद युवकाचा वावर होता, असे समजते. शहरातील हा युवक यापूर्वी एका चोरीप्रकरणात सहभागी होता. कणकवलीत निम्मेच पोलीस कणकवली पोलीस ठाण्यात एकूण ८० पोलीस कर्मचारी आहेत. यापैकी काही आऊटपोस्टसाठी, काही प्रशिक्षणासाठी जातात. काही सुटीवर असतात. काही अंगरक्षक म्हणून ड्युटीवर असतात. अशा विविध कारणांनी सध्या फक्त ३८ कर्मचारीच पोलीस ठाण्यात असतात. त्यामुळे कामावर असलेल्यांवर सेवेचा ताण येत आहे.
पाच बंगले फोडले
By admin | Published: June 14, 2015 12:47 AM