वैभववाडी : येथील बसस्थानकासमोरच्या इमारतीमध्ये राजरोस चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ५ जणांना रंगेहात पकडले. ही कारवाई सकाळी ११.३० वाजता केली. कणकवली न्यायालयाने प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची कारवाई करून त्यांना सोडले.वैभववाडी बसस्थानकासमोरच्या इमारतीमध्ये राजरोस जुगार अड्डा चालवला जातो. याबाबत माहिती मिळाल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लाड यांच्यासमवेत पोलिसांच्या पथकाने सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी पाचजण जुगार खेळताना रंगेहात पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.मोहन दत्ताराम साळुंखे (वय ४७, रा. खांबाळे), नंदकिशोर सखाराम मुद्रस (वय ४०, रा. उंबर्डे), तुकाराम लक्ष्मण गुरव (वय ६७, रा. कोकिसरे), श्रीपत सखाराम कांबळे (वय ४७, रा. कुसूर), रशिद रहेमान शेख (वय ३२, रा. वाभवे) यांच्याविरूद्ध मुंबई पोलीस अॅक्टनुसार कारवाई करून कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांच्यावर २ हजारांची दंडात्मक कारवाई करून सोडले.बऱ्याच कालावधीनंतर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाचजणांना पकडले. मात्र, ही कारवाई रस्त्याच्या शेजारी सार्वजनिक ठिकाणी केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या कारवाईबद्दल वैभववाडी शहरात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरु होती.वैभववाडी तालुक्यात ठिकठिकाणी राजरोस जुगार अड्डे सुरू आहेत. मात्र, पोलीस यंत्रणा या अड्ड्यांवर कारवाई का करत नाही. असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांनी अशाप्रकारे थेट कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणीदेखील ग्रामस्थांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
जुगार खेळताना पाच जणांना रंगेहात पकडले
By admin | Published: July 08, 2014 10:58 PM