कणकवली : रॉनी गॅँग पोलीस कोठडीत असतानाच शहरात पुन्हा घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या घरफोड्यांमधून ऐवज चोरीस गेला नसल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलीस यंत्रणा हडबडली आहे. रॉनी गॅँगमधील तीन युवकांव्यतिरीक्त पोलिसांचा संशय असलेल्या अन्य युवकांनी हा प्रकार केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरातील शिवशक्तीनगर, साईनगर, कनकनगर परिसरातील बंद घरे आणि फ्लॅटसह काही ठिकाणी गुरूवारी रात्री चोरीचा प्रयत्न झाला. सर्वच बंद घरांतील व्यक्ती मुंबई वा अन्य ठिकाणी असल्याने याबाबत पोलीस स्थानकात कोणत्याही प्रकारची तक्रार नोंद नाही. पोलिसांनीही नेमक्या किती ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला याबद्दल ठोस माहिती दिलेली नाही. मात्र, एकंदर पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजते. मुख्य दरवाजाच्या कडीचा कानोसा तोडून नेहमीच्या पद्धतीने चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. फोडलेल्या घरांतून नेमके काय चोरीस गेले याबद्दल सध्या तपशील उपलब्ध नाही. बंद घरातील व्यक्ती परगावी असल्याने किरकोळ ऐवज गेला असण्याची शक्यता आहे. शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करत धुमाकूळ घालणाऱ्या स्थानिक युवकांची रॉनी गॅँग जेरबंद झाल्यानंतर शहरातील चोरीचे सत्र थंडावले होते. मात्र, पुन्हा घरफोड्या झाल्याने हे चोरटे स्थानिक आहेत की अन्य याबद्दल तर्कवितर्क करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
कणकवलीत पुन्हा पाच ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2015 12:52 AM