राजापूर : कर्जप्रकरणी तारण असलेली जागा लिलावात घेऊन पाच वर्षे उलटली तरी अद्याप आपल्याला बँकेने त्या जागेचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव बँकेच्या कार्यालयापुढे आपल्याला आत्मदहन करावे लागेल, असा इशारा राजापूर अर्बन बँकेचे सभासद प्रकाश कातकर यांनी वार्षिक सभेत दिला.राजापूर अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहात झाली. बँकेचे अध्यक्ष जयवंत अभ्यंकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे व अधिकारी उपस्थित होते. या सभेला सभासदांची उपस्थिती अल्प राहिली. सकाळी ९.३० वाजता सभेला सुरुवात झाली. त्यानंतर विषयपत्रिकेप्रमाणे एकेक विषय घेण्यात आले. नेहमीप्रमाणे बँकेच्या थकबाकीवर मुद्दा उपस्थित करण्यात आला. एकूण थकबाकी किती आहे व ती वसूल का झाली नाही, यावर उपस्थित सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.मागील पाच वर्षांतील थकबाकी ४० लाख ५४ हजारच्या घरात असल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले व त्याच्या वसुलीचे कामही सुरु असल्याची माहिती देण्यात आली.बँकेकडून सभासद कल्याण निधीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. राजापूर जवाहर चौकातील शिवस्मारकाचे नूतनीकरण सुरु केले जाणार असून, त्यासाठी बँकेच्या प्रत्येक सभासदाने यावर्षी मिळणाऱ्या ११ टक्के लाभांशातील २ टक्के रक्कम शिवस्मारकासाठी द्यावी, अशी एकमुखी संमती दिली.बाहेरील कर्जमर्यादा वाढवणे, राज्याबाहेर बँकेचे कार्यक्षेत्र वाढवणे, या विषयांवर चर्चा करून तोडगा काढू, अशी ग्वाही संचालक मंडळासहीत बँक व्यवस्थापनाने दिली. सर्व सहकारी बँका व पतपेढ्या यांनी २० टक्के कृषी कर्ज द्यावे, अशी सूचना शासनाने केली आहे. राजापूर अर्बन बँकेनेही याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. सौंदळ पट्ट्यातील १० गावांना बँकिंग सुविधांचा लाभ मिळत नसल्याने राजापूर अर्बन बँकेची एखादी शाखा सौंदळ गावात सुरु करावी, अशी सूचना सभासदांनी केली.काही दिवसांपूर्वी मनी ट्रान्सफरप्रकरण गाजत होते. या प्रकरणी अपेक्षेप्रमाणेच अनेक सभासदांनी प्रश्न उपस्थित करून याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तथापि त्या प्रकरणी आपण कायदेशीर कारवाईसंदर्भात वकिलाचा सल्ला घेत असून, त्यानंतर दिवाणीसह फौजदारीचा मार्ग अवलंबत असल्याचे सांगून त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. राजापूर अर्बन बँकेचे सभासद प्रकाश कातकर यांनी यापूर्वी कर्ज प्रकरणातील तारण जागा लिलावात घेऊन बराच कालावधी लोटला तरी त्याचा ताबा बँक व्यवस्थापनाने दिलेला नसल्याचा मुद्दा पुढे आला. पूर्वी तशी मागणीही केली होती, पण काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता आपण या बँकेपुढे आत्मदहन करू, असा इशारा कातकर यांनी दिला. मात्र, तुम्ही बँकेत या, याबाबत चर्चा करु, अशी ग्वाही जयंत अभ्यंकर यांनी दिली, तेव्हा कातकर शांत झाले. (प्रतिनिधी)
लिलावात घेतलेल्या जागेचा पाच वर्षांनंतरही ताबा नाही
By admin | Published: August 31, 2015 12:25 AM