सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या चौकुळ गु्रप ग्रामपंचायतीमध्ये उत्कर्ष गाव पॅनेलने एक हाती सत्ता मिळवली. निवडणुकीत शिवसेनेचे पूर्णत: पानिपत झाले तर काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या. मात्र, चौकुळ ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या रामचंद्र जाधव व अभिजीत मेस्त्री यांना धक्का देत काँग्रेसच्या बाबू गंगु कोकरे या नवख्या उमेदवाराने विजयश्री खेचून आणल्याने चौकुळमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. उत्कर्ष पॅनेलने ११ जागा पैकी ९ जागावर विजय मिळवला.चौकुळ ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना, काँग्रेस व भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मात्र, गावात सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी मिळून उत्कर्ष पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. तर काँग्रेस व शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी वेगळे पॅनेल तयार करून निवडणूक लढवली. यात शिवसेना व काँग्रेस यांनी प्रत्येकी ५ उमेदवार उभे केले होते. तर उत्कर्ष पॅनेलने ११ जागा तर अपक्षांनी ५ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे पहिल्यापासून ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नव्हती. ४ आॅगस्टला जेव्हा निवडणुकीसाठी मतदान पार पडले त्यावेळीच सर्वंच उमेदवारांनी निवडून येण्याचे आडाखे बांधले होते. मात्र येथील तहसीलदार कार्यालयात सकाळी मतमोजणी पार पडली. यात उत्कर्ष पॅनेलने बाजी मारल्याचे दिसून आले. यात प्रिती जाधव (३७४), स्मिता गावडे (१६८), विलास गावडे (१६६), रसिका जाधव (२८२), रिता गावडे (१९५), विजय गावडे (१८४), रसिका जाधव (२२४), केशव गावडे (१७०), सुरेश शेटव (२४०) यांनी विजय मिळवला तर काँग्रेसच्या शोभा गावडे यांची पहिल्यांदाच बिनविरोध निवड झाली आहे. तर बाबू कोकरे (२२४) यांनी रामचंद्र जाधव व अभिजीत मेस्त्री या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा पराभव करीत बाजी मारली. या विजयाने चौकुळवासियांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.उत्कर्ष पॅनेलच्या विजयानंतर गुरूवारी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात भाजपच्या नेत्यांनी एकच गर्दी केली होती. यात भाजपचे सरचिटणीस मनोज नाईक, शहर अध्यक्ष आनंद नेवगी, शैलेश तावडे, राजू गावडे, अमित परब, अध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, चंद्रकात जाधव आदीसह उत्कर्ष पॅनेलचे विजयी उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीत बाबू कोकरे याला आपण कोणत्या पक्षातून उभा आहे, आपली निशाणी काय ते माहीत नाही.मात्र, काँग्रेसच्या गुलाब गावडे यांनी त्याची सर्व जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत बाबू कोकरेला निवडून आणले.
चौकुळ ग्रामपंचायतीवर ‘उत्कर्ष’चा झेंडा
By admin | Published: August 06, 2015 9:54 PM