मालवण : गेले तीन सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धडकलेल्या 'ओक्खी' चक्रीवादळाने मच्छीमार बांधवांची अक्षरशः झोपच उडवली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्रात अंतर्गत बदल झाल्याने उधाणाची स्थिती उद्भवली आहे. खवळलेल्या समुद्रात मच्छीमारांच्या नौका भरकटल्याने मच्छीमारांसमोर ऐन हंगामात मोठे संकट आवसून उभे राहिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टी भागात सागरी सुरक्षेची मदार असलेल्या पोलीस प्रशासनाच्या 'सिंधु - ५' या गस्ती नौकेला रविवारी मध्यरात्री उधाणाचा मोठा फटका बसला. लाटांचे पाणी बोटीत शिरल्याने या बोटीला जलसमाधी मिळाली. यात असलेल्या कर्मचाऱ्यांनी लगतच्या 'सिंधु - २' या सागरी गस्त नौकेत स्थलांतर केल्याने मोठा अनर्थ टळला. याचवेळी सिंधू २ या नौकेतही मोठ्या लाटांचे पाणी घुसले मात्र नौकेवरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पाणी उपसा केला.सिंधुदुर्ग पोलिसांच्या सिंधू - २ आणि सिंधू - ५ या दोन गस्ती नौका सागरी सुरक्षेसाठी तैनात असतात. अलीकडेच सिंधू पाच या नौकेने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकाना दणका दिला होता. रविवारी मध्यरात्री समुद्रात आलेल्या उधणाचे पाण्याचे लोट थेट याच सिंधू पाच या सागरी नौकेत घुसले.
नौकेत पाणी घुसतात कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पाणी उपसा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नौका बुडत चालल्याने कर्मचाऱ्यांनी लगत असलेल्या दुसऱ्या सागरी गस्ती नौकेचा आसरा घेतला. मात्र याही नौकेत पाणी घुसले मात्र सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाणी उपसा केल्याने मोठा अनर्थ टळला. सिंधू पाच सागरी नौका अद्ययावत बनावटीची असून जलसमाधी मिळाल्याने पोलीस प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.पोलीस अधीक्षक मालवणातपोलीस दलाच्या सिंधू पाच या गस्ती नौकेला जलसमाधी मिळाल्याचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम सोमवारी सकाळी १० वाजता मालवण बंदर जेटी येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी बुडालेल्या नौकेची पाहणी करत पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनीही मालवणला भेट देत नौकेची पाहणी केली.
समुद्रात पाण्याचा वेग व उधणाची स्थिती असल्यामुळे पाणी ओसरल्याचा अंदाज घेऊन नौका बाहेर काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी कैलास खांदारे, मारुती भाबल, रणजित खांदारे, सुनील खांदारे या मच्छीमारांनी नौका बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले.
मच्छीमारांची धावाधावओक्खी चक्रीवादळाचा तडाखा मच्छीमार बांधवाना मोठ्या प्रमाणात बसला. मालवण, वायरी, तारकर्ली, देवबाग, आचरा या किनारपट्टी भागात पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी लोकवस्तीतही पाणी घुसले. वादळाच्या तडाख्यात तीन रापण नौका तर दोन पर्यटन नौका भरकटल्या. त्यातील कुबल रापण संघ व नारायण तोडणकर यांच्या नौका किनाऱ्यावर आणण्यासाठी मच्छीमार बांधवांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले.
तारकर्ली येथेही समुद्रात फसलेल्या पर्यटन नौकाना स्कुबा डायव्हरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. समुद्रात उधणाचा जोर रविवारी रात्रीपासून सोमवारी दुपारपर्यत कायम राहिल्याने किनारपट्टीवरील वस्तीत भीतीचे वातावरण असून दर्यराजा किनाऱ्यावर थांबून आपल्या सहकार्यांना मदतकार्य कार्य करत आहे.