खारेपाटण : गेले दोन दिवास सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीला पूर आल्याने तर सह्याद्री खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून यामुळे खारेपाटण गावाला पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान पुरपरस्थितीची पाहणी करण्यासाठी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,ग्रामविकास अधिकारी जि. सी.वेंगुर्लेकर, खारेपाटण तलाठी उमेश सिंगनाथ,कृषी सेवक सागर चव्हाण आदी उपस्थित राहून पूरपरीस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी केले आहे.गेली आठ ते दहा दिवस पावसाने दडी मारल्यानंतर रविवार पासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.तर चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे काहीसा सुखावला असून शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे.खारेपाटण येथे पूरपरिस्थिती मुळे शुकनदीच्या पात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले असून यामुळे खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून खारेपाटण बाजारपेठ मधून बंदरवाडी व सम्यकनगर कडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याच्या खाली गेला असून येथील वस्तीचा यामुळे संपर्क तुटला आहे.तर खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याचा वेढले आहे.
येथील सर्व गळ्यात पुराचे पाणी गेले आहे. याचबरोबर खारेपाटण बाजरपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक बंद आहे. खारेपाटण मधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली असून सुमारे ५ फूट पेक्षा अधिक पाणी शेत पिकात घुसले आहे. मुंबई - गोवा महामार्गावरून खारेपाटण शहरात येणारा मुख्य रस्ता खारेपाटण हायस्कुल रोड ते खारेपाटण बसस्थानक ग रस्ता देखील पाण्याची खाली जाऊन वाहतूक बंद होण्याच्या स्थितीत आहे.खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इमारतीचा तळमजला पूर्णताह बुडाला असून पहिल्या मजल्यावरील व्यापारी गाळे धारक पुराच्या भीतीने आपल्या वस्तूची आवराआवर करत आहेत. जर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची दाट शक्यता असून खारेपाटण मधील व्यापारी भीतीच्या छायेखाली आहेत.दरम्यान मासळी मार्केट रोड वरील काही दुकानामध्ये पाणी जायला सुरवात झाली आहे.शुक नदीने धोक्याची पातळीओलांडल्याने पुराचे पाणी खारेपाटण - चिंचवली रस्त्यावर आले असून हा रस्ता पाण्याखाली गेला आहे.यामुळे येथील वाहतूक पूर्णताह बंद झाली आहे.