सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात बांदा, माडखोल, धवडकी, ओटवणे, इन्सुली गावासाठी मध्यरात्र काळरात्र ठरल्याचे दिसून आले. अनेकांच्या घरात, दुकानात काही क्षणात पाणी घुसल्याने हाहाकार उडाला आहे. तर शेर्ले इन्सुलीसह अनेक गावांचा संपर्कच तुटला होता.
झाराप पत्रादेवी मार्गावरील इन्सुली खामदेव नाक्यावरील दोन्ही बाजूची घरे पाण्याखाली गेली असून इन्सुली बिलेवाडीतील काही ग्रामस्थ हे घरातच अडकून पडले होते. ओटवणेमध्येही असाच प्रकार घडला होता. या अचानक आलेल्या पुरामुळे अनेकांचे घरातील सामान पूरात वाहून गेले. शिवाय ओटवणेत 400 कोंबड्या वाहून गेल्या आहेत. या सर्व नुकसानीचा आकडा अंदाजे कोटीच्या घरात आहे.
सावंतवाडी तालुक्यात गुरूवारी मध्यरात्रीनंतर पावसाने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळेच अचानक हाहाकार सर्वत्र पाहायला मिळाला. अनेकजण गाढ झोपेत असतानाच पाणी कधी दुकानापर्यंत आले समजलेच नाही. माडखोल धवडकी येथे तर अनेकांनी पुराचे पाणी अवघ्या काही क्षणात वाढल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही मिळेल त्या ठिकाणी धावत सुटलो. गाड्या छपराला दोरीने बांधल्याचे सांगितले. मात्र एक रिक्षा तसेच दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. सत्तर ते पंचाहत्तर घरात तसेच तीस ते चाळीस दुकानात पाणी घुसल्याने सामानाचे नुकसान झाले आहे.
माडखोल वरची धवडकी व खालची धवडकी येथे महामार्गाला लागून जवळपास तीस पेक्षा अधिक विविध प्रकारची दुकाने आहेत या सगळ्या दुकान व्यावसायिकांना या महापूराचा जोरदार फटका बसला आहे संपूर्ण बाजारपेठेत तब्बल आठ ते दहा तास पाण्याखाली होती शुक्रवारी सकाळी दहा नंतर पुराचे पाणी ओसरले. धवडकी बाजारपेठेमध्ये नदीच्या काठावर वजराठ ता.वेगुर्ला येथील पांडुरंग परब यांची श्रद्धा नर्सरी पूर्णतः पुरामध्ये वाहून गेली यात त्याचे जवळपास तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत कर्पे यांचे पशुखाद्य नम्रता मडगावकर यांचे नवदुर्गा मेडिकल प्रदीप वालावलकर यांच्या दत्तकृपा ऑफसेट प्रिंटिंग प्रेस, राजेश शिरवळ यांचे हॉटेल, विष्णु राऊळ यांचे राऊळ ॲग्रो सर्व्हिसेस खत विक्रीकेंद्र, संतोष सावंत यांचे चायनीज सेंटर, वासुदेव होडावडेकर यांचे सलून, किशोर सोंदेकर यांचे इस्त्री दुकान, गुरुनाथ राऊळ याच्या इलेक्ट्रिकल्स दुकानामध्ये पाणी गेल्याने नुकसान झाले, यामध्ये प्रदीप कालवणकर यांच्या प्रिंटिंग प्रेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याठिकाणी असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये ही पाणी घुसल्याने येथील महत्वाचे कागदपत्र व कॉम्प्युटरचे तसेच फर्निचरचे ही आहे प्रचंड नुकसान झाल्याचे शाखा व्यवस्थापक हेमंत कुमार यांनी सांगितले.
धवडकी परिसरात असलेल्या सुमारे 70 घरांना या पुराचा फटका बसला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतेही मनुष्य हानी झाली नसली तरी एका परीक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रिक्षा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठा फटका बसला पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने गाड्या वाहून जात असल्याचे लक्षात येताच अनेकांनी आपल्या गाड्या दोरीच्या साह्याने बांधून ठेवल्या. रात्री दोन वाजल्यापासून पहाटे पर्यंत आहे येथील जनतेने अक्षरशा पुराचा थरारच अनुभवला.
यापुर्वी असा प्रकार आम्ही कधीच पाहिला नव्हता तसेच पुराचे पाणी यापूर्वी कधीच बाजारपेठेमध्ये घुसले नव्हते असे येथील ग्रामस्थ तथा शिवसेना शाखा प्रमुख विजय राऊळ, महेश राऊळ,जयप्रकाश मडगावकर यांनी सांगितले. कदाचित सांगेली सनमटेंब येथील धरणाचे पाणी सोडल्यास असा प्रकार घडू शकतो किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने हा प्रकार घडला असावा असेही ते म्हणाले. या ठिकाणी असलेल्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे तसेच गाळ साचल्याने नदीचे पात्र बुजून गेले आहे याचा परिणाम महापुराच्या रूपाने दिसून आला आहे, पूर्वी असलेल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह आता रस्त्याच्या बाजूने आला आहे असेही त्यांनी सांगितले.