माणगाव (सिंधुदुर्ग) : माणगाव खोऱ्यातील दुकानवाड भागात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुकानवाड, वसोली, वीरवाडी, शिवापूर, चाळोबा येथील पूल पाण्याखाली गेल्याने वसोली, आंजिवडे, शिवापूर भागातील वाहतूक ठप्प आहे. सकाळपासून पावसाने जोर धरल्याने सखल असलेले दुकानवाड पूल पहिले पाण्याखाली गेले. त्यामुळे या भागातील वाहतूक सकाळपासून बंद आहे.मंगळवार हा माणगाव येथील आठवडा बाजाराचा दिवस असल्याने बाजारासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. तसेच शाळकरी मुलांनी घरीच जाणे पसंद केले. सर्व गाड्या टाळंबा येथून परत येत होत्या. दिवसभर पुलावरून पाणी जात असल्याने शिवापूर, वसोली, आंजिवडेवासियांना १२ ते १३ किलोमीटर पायपीट करत घर गाठावे लागले.आंबेरीचा जूना पूल पाण्याखालीसायंकाळी ४ वाजता आंबेरी पुलावर पाणी येण्यास सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाणी ओसरले नव्हते. यावर्षी आंबेरी नदीवर नवीन पूल झाल्याने वाहनधारकांनी या पुलाचा आश्रय घेतला. सर्वच वाहतूक नवीन पुलावरून सुरू होती. दरवर्षी तासनतास या पुलावर वाहनांना थांबावे लागत होते.२७ गावांचा संपर्क तुटत होता. शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. मात्र, आता पुल झाल्याने या भागातील वाहतूक नवीन पुलावरून सुरू होती.
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; माणगाव खोऱ्यातील पाच पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 18, 2023 6:42 PM