कऱ्हाड : लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सांगायचे झाले तर लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी फक्त कॉलर उडवण्याचे काम केलेले आहे. त्यांनी एकदा शेतकऱ्यांसाठी कॉलर उडवावी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बळीराजा शेतकरी संघटनेला सहकार्य करावे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्र्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
जीवनावश्यक कायद्यातून सर्व शेतमाल वगळला पाहिजे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे नवीन कायदे बनवले पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना ताकद मिळावी व त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी बळीराजा शेतकरी संघटना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरली आहे. येणारी निवडणूक ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक असणार आहे.कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बी. जी. पाटील, जिल्हाद्यक्ष साजिद मुल्ला, उन्मेष देशमुख, भीमाशंकर बिराजदार आदी उपस्थित होते.पंजाबराव पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. सगळ्याच चाव्या बारामतीतून फिरताना दिसत आहेत. यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा आहे, त्यांचा विचार आज जिल्ह्यात कुठेही जोपासलेला पाहायला मिळत नाही.
बारामतीच्या चाव्यांवर सातारा जिल्ह्यातील खासदार आणि आमदार पळत आहेत. सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी जिल्ह्यातला माणूस प्रतिनिधी असला पाहिजे म्हणून सातारा जिल्ह्यातून बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येणारी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी बी. जी. पाटील म्हणाले, आता कोणाची जिरवायची आणि कोणाला हरवायचं, यापेक्षा लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवून ती जिंकायची, असा मी निर्णय घेतला आहे. रयतेचा जाहीरनामा आम्ही तयार करत असून, तो घेऊन येणारी निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवणार आहोत.