देवगड : चांगले पर्यटन, उत्तम फळफळावळ बागा व उच्च दर्जाची मच्छिमारी यातूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा व पर्यायाने देवगडचा विकास होणार आहे. देवगडचा आनंदवाडी प्रकल्प मार्गी लावणे व नगरपंचायतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असा कोकणचा विकास घडवू असे अभिवचन ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी देवगड पंचायत समितीच्या खास आढावा बैठकीत रविवारी दुपारी उपस्थितांना दिले. यावेळी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सभापती डॉ. मनोज सारंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, विलास साळसकर, सदाशिव ओगले, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तहसीलदार प्रतिनिधी अशोक शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हा हा कायदा पाळणाऱ्यांचा जिल्हा आहे. स्वच्छतेशी तो प्रामाणिक आहे. येथील विद्यार्थ्यांचा बुध्यांक उच्च दर्जाचा आहे. या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून व राजकारणविरहीत विकास हे कर्तव्य मानून मी ग्रामविकास खात्याचा कारभार करीन, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केले. केंद्र व राज्य सरकारांच्या अनेक ग्रामविकास योजना समन्वयाअभावी जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यांचा अभ्यास करून त्या या जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही ते म्हणाले. देवगड तालुका कातळी दगडाचा भूप्रदेश असल्याने येथे रेनवॉटर हार्वेस्टींगचा प्रयोग जास्तीत जास्त व्हायला हवेत. सागरी महामार्गाच्या माध्यमातून पर्यटन विकास व्हायला हवा व या महामार्गालगत पाणी, वीज वाहिन्यांचे जाळे पसरले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. आंबा पिकात आंतरपिके घेणे गरजेचे आहे. देवगड पंचायत समितीच्या प्रगतीचा आलेख सादर करताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी यशवंत राज योजनेतील राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिकांसह अन्य राज्य पुरस्कार व ग्रामीण स्तरावरील पुरस्कारांचा उल्लेख केला. तसेच तालुक्याला लाभलेल्या ७५० किलोमीटर लांबीचे रस्ते दुरुस्तीकरणाची मागणी पुढे केली. देवगड पंचायत समितीची जुनी इमारत नूतनीकरणासाठी २ कोटींचा निधी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)देवगड नगरपंचायत व उपजिल्हा रुग्णालयदेवगडसाठी नगरपंचायत प्रस्ताव प्रलंबित आहे. नगरपंचायत झाली की उपजिल्हा रुग्णालयाची प्रलंबित कामेही पूर्ण होतील. शिवाय वेगळा निधी मिळेल व विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कृषी पर्यटन योजना देवगड आंबा बागायतदारांनी राबविण्याचा सल्ला देण्यात आला. व्यापारी संघटना, देवगड तालुका पर्यटन संस्था व ग्रामविकास मंडळातर्फे विविध निवेदने सादर. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक व अन्य मान्यवरांचाही सत्कार झाला.देवगड पंचायत समिती, तालुका कृषी विभाग, कर्मचारी संघटना आदींतर्फे राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.देवगडच्या बागायतदारांनी कृषी पर्यटनासारखे प्रकल्प राबवावेत व पर्यटनाला उभारी द्यावी.
आनंदवाडी-नगरपंचायत प्रस्तावाचा पाठपुरावा करणार
By admin | Published: December 14, 2014 9:33 PM