सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सेव, नवरात्र व दहीहंडी उत्सव कालावधीत सर्व सार्वजनिक मंडळांनी ध्वनीप्रदूषण कायद्याचे पालन करावे. उत्सवामध्ये सर्वांनी शांतता राखून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हधिकारी अनिल भंडारी यांनी केले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जनहित याचिकेनुसार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सर्व सार्वजनिक मंडळांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अनिल भंडारी बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, प्रांताधिकारी कणकवली संतोष भिसे, सावंतवाडी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण, जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जनहित याचिकेसंदर्भात सादरीकरण केले. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) २000 अन्वये प्राधिकृत केलेले अधिकारी, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, अधिनियम २९, कलम ३, ६, २५ यांची सविस्तर माहिती यावेळी दिली. उत्सवाच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, मार्गदर्शक तत्वे, आवाजाची दिवसा व रात्री असणारी क्षमता, शासनाच्या सुचनेप्रमाणे पोलीस विभाग, महसूल विभाग, नगरविकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पर्यावरण विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग या विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी म्हाणून नेमण्यात आलेले असून त्यांची संपूर्ण माहिती व त्यांचे कार्यालयाचे ‘ई मेल आयडी’ ही जाहीर करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)कायद्याचे उल्लंघन करु नकाजिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, दंहीहंडी व गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करतो. तसेच न्यायालयाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. ध्वनी प्रदुषणाबाबत काही तक्रारी असल्यास 0२३६२-२२८८४७ या क्रमांकावर सुचना कराव्यात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या बाबतीत धडक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. आपण कायद्याचे पालन करणारे जबाबदार नागरिक आहात. कायद्याचे उल्लंघन करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
ध्वनी प्रदूषण कायद्याचे पालन करा
By admin | Published: August 06, 2015 9:58 PM