सावंतवाडी : माझ्या मतदार संघात येवून माझ्यावर बोलणारे आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधात बोलताना मर्यादा पाळाव्यात, मी त्यांच्या मतदार संघात जावून बोललो तर त्यांना परवडणार नाही, असा इशाराच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे यांना दिला आहे.
ते शुक्रवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान महिला विधेयक मंजूर झाले असले तरी कोणाचे नुकसान होणार नाही. सभागृहातील काही जागा वाढविण्यात येणार आहे. त्यामुुळे महिलांची संख्या वाढली तरी ज्या चांगल्या व्यक्ती आहेत त्यांना निश्चितच राजकारणात स्थान मिळणार आहे, असेही मंत्री केसरकर म्हणाले.
शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे गुरूवारी सावंतवाडीत आले होते.यावेळी त्यांनी केसरकर यांच्यावर टिका केली होती.त्या टिकेला मंत्री केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.
मंत्री केसरकर म्हणाले,माझ्याच मतदार संघात येवून आदित्य ठाकरे माझ्या विरोधात बोलत असतील तर ते मी सहन करणार नाही ते माझ्या पेक्षा लहान आहेत त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात बोलताना मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. आज पर्यंत मी ठाकरे कुंटूबियांच्या विरोधात बोललो नाही आणि त्यांनी तशीच टिका सुरू ठेवली तर मी त्यांच्या मतदार संघात जावून त्याच्या विरोधात अनेक काही गोष्टी बोलू शकतो.
मात्र त्यावेळी ते ठाकरेंना परवडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी महिला विधेयकाच्या बाबत त्यांना विचारले असता केसरकर म्हणाले, या विधेयकामुळे नारी शक्तीचा खर्या अर्थाने विजय झाला आहे. विधेयक मंजूर झाल्याने याचा फायदा आता महिलांना होणार आहे. मात्र सद्यस्थिती लक्षात घेता विरोधकांनी एकीकडे श्रेय घेण्यास सुरवात केली आहे तर दुसरीकडे जागा कमी होणार आहे, अशी ओरड सुरू केली आहे.
मात्र या निर्णयामुळे जागा वाढणार आहे. त्यामुळे ज्यांनी सभागृहात चांगले काम केले आहे. त्यांना निश्चितच पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळणार आहे, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.