सिंधुदुर्ग : लोकसभेच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या मतदार संघात अखेर भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गुरूवारी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि भाजप यांच्यामध्ये उमेदवारीवरून सुरू असलेली रस्सीखेच संपली आहे. नारायण राणे उद्या १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर या मतदार संघातील विद्यमान खासदार यांनी उद्धवसेनेत कायम राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या शिंदेसेनेने हा सेनेचा पारंपरिक मतदार संघ असल्याने तो आपल्याला मिळावा म्हणून आग्रह धरला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत या जागेसाठी आग्रही होते. त्यामुळे राज्यातील इतर भागातील महायुतीचे जागावाटप झाले तरी या मतदार संघाबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता.
भाजपच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच उमेदवारीभाजपच्या स्थापनेपासून मागील ४४ वर्षांत पहिल्यांदाच महायुतीतून लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून ‘एनडीए’च्या राष्ट्रीय समितीने निवड जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षासाठी ही आनंददायी घटना आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ओरोस येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपाचे २५ हजार कार्यकर्ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीत जाणार असल्याचेही सावंत यांनी जाहीर केले.
कोकणात कमळ फुलविण्यासाठी प्रयत्नकेंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मागील आठ दिवसापासून जोमाने प्रचारास सुरूवातदेखील केली होती. प्रचारात महायुतीला आणि पर्यायाने भाजपाला कमळ निशाणीवर मतदान करा, असे आवाहन ते करत होते. तर दुसरीकडे शिंदेसेनेकडून मंत्री उदय सामंत ही जागा आपल्याला मिळावी म्हणून आटोकाट प्रयत्न करीत होते. अखेर ही जागा पदरात पाडण्यात भाजपाला यश आले आहे. आता महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते कशी प्रचार यंत्रणा राबवितात यावर विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत.