दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींच्या उपद्रवाने हैराण झालेल्या बाबरवाडीतील शेतकऱ्यांच्या संतापाचा मंगळवारी कडेलोट झाला. काँगे्रस पदाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या झालेल्या हत्ती नुकसानीची पाहणी करण्याचे आश्वासन देऊनही दोडामार्गचे वनक्षेत्रपाल बाबूराव शिंदे उपस्थित राहिले नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक रूप धारण करीत घटनास्थळी उपस्थित असलेल्या वनकर्मचाऱ्यांनाच कोंडीत पकडले. याची माहिती मिळताच बाबरवाडीत दाखल झालेल्या वनक्षेत्रपालांना काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात गेल्या महिनाभरापासून जंगली हत्तींचा उपद्रव सुरू आहे. बाबरवाडी, विजघर परिसरात या हत्तींच्या नेहमीच्या नुकसानसत्रामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिणामी केवळ केविलवाण्या उपाययोजना करण्यापेक्षा कुडाळ तालुक्याप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातही हत्ती पकड मोहीम राबविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँगे्रसचे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, प्रेमानंद देसाई आदी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हत्ती नुकसानीची दोडामार्गचे वनक्षेत्रपाल बाबूराव शिंदे यांना सोबत घेऊनच पाहणी करण्याचे नियोजन केले होते. त्याला शिंदे यांची सहमती होती. ठरल्याप्रमाणे मंगळवारी काँग्रेस पदाधिकारी बाबरवाडीत दाखल झाले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. मात्र, दोडामार्गचे वनक्षेत्रपाल बाबूराव शिंदे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी प्रतिनिधी म्हणून कोनाळ येथील वन अधिकाऱ्यांना पाठविले. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झाले. शिंदे यांची भूमिका शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच जोपर्यंत शिंदे दाखल होत नाहीत, तोपर्यंत उपस्थित वनकर्मचाऱ्यांना घरी जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा धारण केला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आक्रमकता पाहून अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची कल्पना शिंदे यांना दूरध्वनीवरून देताच ते तातडीने बाबरवाडीत दाखल झाले. हत्तींचे संकट कायमचे दूर करण्यासाठी हत्तीपकड मोहीम राबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी हेवाळे ग्रामपंचायत सदस्य संदीप देसाई, काका देसाई, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमेश दळवी, गुरू देसाई, समीर देसाई आदी शेतकरी व काँगे्रस पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आश्वासन...अखेर बाबूराव शिंदे यांनी याबाबतचा अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना व आपल्या वरिष्ठांना सादर करण्याचे आश्वासन दिल्यावर शेतकरी शांत झाले. शिवाय मंगळवारपासून १६ वन कर्मचारी हत्ती बंदोबस्तासाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच हत्तीपकड मोहीम राबविण्याबाबत अहवाल तयार करून येत्या चार दिवसात जिल्हाधिकाऱ्यांशी होणाऱ्या बैठकीवेळी तो सादर केला जाईल, असे आश्वासन दिले.
वनक्षेत्रपालाला धरले धारेवर
By admin | Published: June 16, 2015 11:33 PM