संदीप बोडवेमालवण: समुद्रातील दुर्मिळ जैव परिसंस्थेचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र वनविभागाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्याप्रमाणे वनविभागाकडून जंगलात दैनंदिन पेट्रोलिंग केले जाते, त्याचप्रमाणे आता वनरक्षकांच्या माध्यमातून समुद्राच्या पाण्याखालीही पेट्रोलिंग केले जाणार आहे. यासाठी वनविभागाच्या फ्रंट लाईन वर्कर्सला स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण देऊन तयार ठेवण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील दुर्मिळ सागरी अधीवासाला संरक्षण देण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब ठरणार असल्याचे बोलले जात आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने नुकतेच मँग्रोव्ह फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने मालवण सागरी अभयारण्य, मॅंग्रोव्ह सेल, महाराष्ट्र वन विभागाच्या फ्रंटलाइन कर्मचार्यांसाठी वेंगुर्ला येथे चार दिवसीय स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. या वन रक्षकांना स्कुबा डायव्हिंग क्षेत्रातील मानक संस्था आलेल्या पॅडी अंतर्गत ओपन वॉटर डायव्हर श्रेणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरलांचे कब्रस्थान होणे, रोखले जाणार? मालवण सागरी अभयारण्य क्षेत्रात असलेल्या दुर्मिळ कोरल्सची (प्रवाळ) काही ठिकाणी हानी झाली आहे. सागरी पर्यटना सारख्या उपक्रमांमुळे या भागात अनिर्बंध हस्तक्षेप वाढला आहे. अलीकडेच झालेल्या अभ्यासांमध्ये प्रवाळ समुहांची काही क्षेत्रे कोरालांची कब्रस्थान बनत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याला अनिर्बंध मानवी हस्तक्षेप जबाबदार असल्याचे म्हणण्यात आले आहे. मालवण आणि निवती रॉक सह सिंधुदुर्गच्या सागरी क्षेत्रात असलेले विविध प्रवाळ समूह, दुर्मिळ सागरी जीवांचा असलेला अधिवास जपला जावा, त्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने सागरी वन रक्षकांना पाण्याखाली वावरण्याचा प्रत्यक्ष अनुभव असावा. त्यांना याभागात प्रत्यक्ष पेट्रोलिंग आणि मॉनिटरिंग करता यावे यासाठी प्रशिक्षित केले जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तस्करी वर आळा बसेल? मालवणच्या सागरी अभयारण्यात ब्लॅक कोरल्स आढळून येतात. महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, या भागात ब्लॅक कोरल्स अर्थात इंद्रजालची तस्करी झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मागील वर्षी वालसर या समुद्री जीवाच्या सुळ्याच्या तस्करीत सिंधुदुर्ग मधून एकास अटकही झाली होती. तस्करीला आळा घालण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग बरोबरच स्थानिकांना वन विभागाकडून मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी होत आहे. शासकीय संस्था ऐवजी खासगी संस्थेत प्रशिक्षण? वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून मालवण सागरी अभयारण्य, कांदळवन विभाग आणि महाराष्ट्र वन विभागाच्या फ्रंटलाइन कर्मचार्यांसाठी स्कुबा डायव्हिंग चे प्रशिक्षण देण्यासाठी शासनाच्या तारकर्ली येथील शासकीय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अक्वॉटिक स्पोर्ट्स (इसदा) ऐवजी वेंगुर्ले येथील एका खासगी संस्थेची निवड करण्यात आली. याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वनरक्षक आता समुद्राच्या पाण्याखाली घालणार गस्त!, सागरी अधिवासाच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुखद बाब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 12:10 PM